नाशिक : कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या रेमडीसिव्हर इन्जेक्शनच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली असून आता नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात केवळ ८९९ रुपयांमध्ये हे इंजेक्शन उपलब्ध होणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यात सध्या १५ हजार रेमडीसीव्हरचा साठा उपलब्ध असून रविवारी (दि.२८) आणखी ६ हजार ३४५ इंजेक्शनचा साठा उपलब्ध होणार असल्याची माहितीही त्यांनी शनिवारी (दि.२८) पत्रकार परिषदेत दिली आहे.
नाशिक जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी नाशिक मनपासह मालेगाव मनपा व जिल्ह्यातील रुग्णालयांमधील रेमडीसिव्हर व ऑक्सिजनची आवश्यकता, उपलब्धता व पुरवठा याविषयी शनिवारी (दि.२७) आढावा घेतला. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या मध्यस्थीतून घाऊक विक्रेते व किरकोळ विक्रेत्यांचा नफा कमी करून नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात रेमडीसीव्हर इंजेक्शन ८९९ रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगितले. तसेच गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी रुग्णसंख्या वाढली असली तरी गंभीर रुग्णांची संख्या कमी प्रमाणात असल्याने तुलनेत ऑक्सिजनची आवश्यकताही कमी प्रमाणात भासत आहे. मात्र संबधित रुग्णालयांनी ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेऊन ऑक्सिजनची ४८ तास अगोदरच ऑक्सिजनची मागणी नोंदविण्यासोबतच रुग्णालयांनी ऑक्सिजनचे प्रमाण व दर याबाबत परवानाधारक पुरवठादारांसोहच तो योग्य तो करार करावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
इन्फो -
मालेगावसाठी तीन हजार रेमडीसिव्हर
मालेगावमध्ये कोव्हिड संसर्ग होत असलेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने औषधे व ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने शनिवारी (दि.२७) मालेगांव महानगरपालिका आयुक्त दीपक कासार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत औषधे व ऑक्सिजन उपलब्धतेतील अडचणीवर चर्चा झाली. त्यानुसार जिल्हा शासकीय रुग्णालयातून तीन हजार इंजेक्शनचा साठा उपलब्ध करून आला असून अधिकन्या साठ्यासाठी नाशिक जिल्ह्यासाठी नियुक्त वितरकांकडून शासकीय दराने इंजेक्शन उपलब्ध करुन घेण्यास सांगण्यात आले आहे.