नाशिक : मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी दिलेल्या लढ्यानंतर समाजाने ऐतिहासिक यशप्राप्ती करीत आरक्षणाचा लढा विजयी केला. परंतु, हा लढा लढताना ४२ तरुणांनी आरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यामुळे या अभूतपूर्व लढ्यात समाजाला दिलासा मिळाला असला तरी नाशिक सकल मराठा समाजाने आनंदोत्सव साजरा न करता रामकुंड परिसरात सर्व हुतात्म्यांचे स्मरण करून दीपप्रज्वलित करून श्रद्धांजली अर्पण केली. कोपर्डीच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटनेनंतर मराठा समाज मतभेद बाजूला सारत ‘एक मराठा, लाख मराठा’ हे घोषवाक्य घेऊन लाखोंच्या संख्येने लहान मुलांसह महिला, पुरुष, युवकांसह ज्येष्ठ नागिरकांसह मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला. या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यासोबतच मराठा समाजाच्या आरक्षणासाठी यामाध्यातून ऐतिहासिक मूक मोर्चे काढून लढा देण्यात आला. या आंदोलनात जवळपास १५ हजार आंदोलकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच ४२ तरुणांना आरक्षणाच्या लढ्यात आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. या घटनांना परिस्थितीत शासन व प्रशासनाने घेतलेली भूमिका कारणीभूत असल्याने आरक्षण विधेयक स्वागरतार्ह असले तरी या लढ्यात गमावलेल्या समाजबांधवांचे दु:खही यासोबत आहे. त्यामुळे नाशिक मराठा क्रांती मोर्चातर्फे या समाजबांधवांचे स्मरण करून रामकुं डावर दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक शिवाजी सहाणे, करण गायकर, तुषार जगताप, सचिन पवार, विलास जाधव, उमेश शिंदे, नीलेश मोरे ,चेतन शेलार, सोमनाथ जाधव, गणेश कदम, शिवाजी मोरे, विजय खर्जुल, मनोज सहाणे, सागर पवार, सूरज पवार, विजय खर्जुल, सोमनाथ जाधव, सचिन शिंदे, प्रशांत अवटे, पूजा धुमाळ, मंगला शिंदे, मयुरी पिंगळे, अस्मिता देशमाने, प्रियदर्शनी काकडे, प्रीती महाजन आदी उपस्थित होते.
आनंदोत्सव साजरा न करता हुतात्म्यांचे स्मरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2018 1:24 AM