मुंजवाड : शिरवाडे येथील अपघातात ठार झालेल्या सावित्रीच्या लेकींची आठवण कायमस्वरूपी राहावी म्हणून मुंजवाडच्या सरपंच प्रमिला पवार यांनी वटपौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाची लागवड करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले.किकवारी येथून नाशिक येथे लग्न सोहळ्यासाठी जाणाऱ्या गाडीचा अपघात होऊन त्यात नऊ जण ठार झाले. त्यात मुंजवाड येथील शोभा संतोष पगारे, मोहिनी विनायक मोरे आणि ऊर्वशी (सिद्धी) विनायक मोरे या तिघींचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत होती. त्यांच्या पंचक्रि येच्या दिवशी वटपौर्णिमा आल्याने त्यांची आठवण कायम राहावी म्हणून येथील स्मशानभूमी परिसरात वटवृक्षाची लागवड सरपंच प्रमिला साहेबराव पवार, सदस्य नलिनी भावेश जाधव, मनीषा दिगंबर जाधव, मानसी नारायण जाधव, लक्ष्मीबाई गोकुळ खैरनार, दीपाली जाधव यांच्या हस्ते करण्यात आली.ऊर्वशी (सिद्धी) विनायक मोरे हिची आठवण कायम राहावी यासाठी येथील जनता विद्यालयातील तिच्या मैत्रिणींनी शाळेच्या आवारात वटवृक्षाची लागवड केली.