शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार व रिमझिम पावसामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाढ झाल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पूर्वी पाच हजार क्यूसेक क्षमतेने पाणी सोडल्यानंतर जुन्या भाजीबाजारात पाणी शिरत होते. मात्र आता नदीपात्रात असलेले काँक्रिटीकरण काढल्याने पुराची तीव्रता कमी झाली आहे. दोन दिवसांपूर्वी धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यानंतर पुराचे पाणी जुन्या भाजीबाजाराच्या पायरीपर्यंत आल्याचे दिसून आले. गोदावरी नदीपात्रातील काँक्रिटीकरण काढल्याने पुराच्या पाण्याची तीव्रता कमी झाली, शिवाय पुराचे पाणी नदीच्या पात्रापुरते मर्यादित राहिले आहे. दुतोंड्या मारुती ते गाडगे महाराज पूलदरम्यान नदीपात्रातून जवळपास शेकडो टन काँक्रीट काढण्यात आले आहे. कॉंक्रीट काढल्याने नदीपात्रातून वाहणाऱ्या पाण्याचा वेग वाढला असून, पूरपातळी काही प्रमाणात कमी झाल्याचा दावा परिसरात राहणाऱ्या स्थानिक नागरिकांनी केला आहे. तर नदीपात्रात शिल्लक असलेल्या काही कुंडातील काँक्रिट अद्याप काढलेले नाही ते काढले तर आगामी कालावधीत धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यानंतर पाणी नदीपात्रातून वहन होत पुराची पातळी आणखी कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
इन्फो===
गोदावरी नदीत केलेल्या काँक्रिटीकरणामुळे पावसाळ्यात नदी-नाल्याचे पाणी आले तरी नदीपात्र भरगच्च होऊन पाणी बाहेर यायचे. मात्र आता काही प्रमाणात ज्या भागातील काँक्रीट काढल्याने त्या भागातील पुराची तीव्रता कमी झाली आहे.
-देवांग जानी, अध्यक्ष, गोदाप्रेमी सेवा समिती