निफाड : येथील नगरपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळगाव रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेस मंगळवारी प्रारंभ करण्यात आला.निफाड पिंपळगाव (ब.) रोडवरजवळ एक किमी अंतरावर रस्त्याच्या दुतर्फा अनेक दुकानदारांनी, टपरीधारकांनी, हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्यांनी अतिक्रमण केले होते. त्या अनुषंगाने नगरपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी एकत्रितपणे मंगळवारी सकाळी अतिक्रमण हटाव मोहिमेस केला. शांतीनगर त्रिफुली येथील स्टेट बँकसमोरील निफाड मार्केट यार्डसमोरील बसस्थानकालगत, निफाड पंचायत समितीजवळील, निफाड न्यायालयासमोरील, अतिक्रमण केलेल्या जवळ जवळ बहुतेक शेडधारक, दुकानदारांनी, टपरीधारक, इतर व्यावसायिकांनी स्वत:हून दुकाने हलवली तर फार किरकोळ संख्येने अतिक्रमणे जेसीबीच्या साहाय्याने काढावी लागली. या अतिक्रमित दुकानदारात हॉटेलचालक, चहा टपरीधारक, फळविक्रेते, छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचा समावेश होता. बहुतेक दुकानदार, व्यावसायिक मंगळवारी त्यांच्या दुकानाचे पत्रे काढणे, बांबू काढणे, टपऱ्या हलवणे, या कामात गुंतले होते. अतिक्रमण हटाव मोहिमेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नगरपंचायतचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण, कर्मचारी, निफाड पोलीस यांनी सहभाग घेतला. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी नागरिकांनी गर्दी केली होती. (वार्ताहर)
निफाड येथे अतिक्र मण हटाव
By admin | Published: April 19, 2017 11:07 PM