सटाणा : येथील नाशिक रस्त्यावरील दऱ्हाणे-आराई शिवनाल्यातील अतिक्रमण काढून नायझिरा पाझर तलावाच्या पाण्याचे स्रोत पूर्ववत करावे, या मागणीसाठी चाळीस ते पन्नास शेतकऱ्यांनी उपोषणाचा इशारा दिला असताना एका शेतकऱ्याने आराई शिवारातील आरम नदीपात्र, नायझिरा, दऱ्हाणे शिवारातील नाल्यावरील सर्वच अतिक्र मणे काढावीत, अशी मागणी केली आहे. शहरातील नाशिक रस्त्यावरील दऱ्हाणे शिवारात शिवनाल्यावर काही वर्षांपूर्वी नायझिरा पाझर तलाव बांधण्यात आला आहे. या तलावामुळे परिसरातील शेतीसिंचनाचा प्रश्न काही प्रमाणात सुटून शेती व्यवसायाला भरभराटी आली होती. मात्र, काही दिवसांपासून एका शेतकऱ्याने सरकारी मोजणी न करता शिवनाल्यावर अतिक्र मण करून पाझर तलावाचे पाण्याचे स्रोत बंद करण्याचा प्रयत्न केला असल्याची तक्र ार चाळीस ते पन्नास शेतकऱ्यांनी तहसीलदार आश्विनीकुमार पोतदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. हमरस्त्यावर होत असलेल्या या अतिक्रमणाकडे सरकारी अधिकारी डोळे झाक करत असल्याचा आरोप संबंधित शेतकऱ्यांनी केला असून, नाला बंद केल्यास शेती उजाड होईल. परिणामी आमच्यावर उपासमारीची वेळी येईल, असेही निवेदनात नमूद केले आहे. संबंधित विभागाने नाल्यावरील अतिक्रमण दहा दिवसांच्या आत हटवावे अन्यथा शेतकरी आपल्या कुटुंबीयांसह तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसतील, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. (वार्ताहर)
पाण्याच्या स्रोतासाठी अतिक्र मण हटवा
By admin | Published: February 01, 2016 10:57 PM