लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यात ब्रिटिशकालीन वळण बंधा-यातील गाळ काढण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि युवामित्र संस्थेत सामंजस्य करार करण्यात आला असून, त्यानुसार आठ तालुक्यांत १४२ गावांतील ७१ हजार कुटुंबांना याचा लाभ होणार आहे. बंधा-यातील गाळ काढल्यानंतर साचणा-या पाण्यातून ५५ हजार एकर क्षेत्राला सिंचनासाठी लाभ होणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी. आणि युवामित्रच्या वतीने व्यवस्थापकीय संचालक सुनील पोटे यांनी या करारावर स्वाक्ष-या केल्या. आतापर्यंत २६ वळणबंधा-यातील गाळ काढल्याचे चांगले परिणाम दिसून आल्याने पुढील टप्प्यात १७० वळणबंधा-यांतील गाळ काढण्यात येणार आहे. यासाठी ३१ जेसीबी यंत्र उपलब्ध करून देण्यात आले असून, ही संख्या ७०पर्यंत वाढविण्यात येणार आहे. यात बागलाण तालुक्यात ३५ गावांतील ४० बंधारे, चांदवड तालुक्यात ३२ गावातील ३९, दिंडोरी १० गावांतील १३, कळवण २१ गावातील २४, मालेगाव १३ गावातील १३, नाशिक १ तालुक्यातील २, निफाड २२ गावांतील २५ आणि सिन्नर तालुक्यात ८ गावांतील १४ बंधा-यांचा यात समावेश आहे.गाळ काढण्यासाठी ५० टक्के खर्च शासन, ४१.९ टक्के खर्च टाटा ट्रस्ट व इतर संस्था आणि ८.१ टक्के खर्च लोकसहभागातून करण्यात येणार आहे. गाळ काढण्याबरोबर पीक पद्धतीत अपेक्षित बदल घडवून आणण्यासाठीदेखील प्रयत्न करण्यात येणार आहेत. स्थानिक नागरिकांचेदेखील या कामात सहकार्य घेण्यात येणार आहे. भविष्यात पाण्याचा सुयोग्य वापर व्हावा यासाठी पाणीवापर संस्था स्थापन करण्यावरही भर देण्यात येणार आहे. गाळ काढण्याच्या कामात ग्रामस्थांचे सहकार्य मिळावे यासाठी जनजागृतीवर भर देण्यात येत आहे. यावेळी टाटा ट्रस्टचे कार्यक्रम व्यवस्थापक मुकुल गुप्ते, अधीक्षक अभियंता राजेश मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, कार्यकारी अभियंता सागर शिंदे, युवामित्र संस्थेचे, कार्यक्रम व्यवस्थापक अजित भोर आदी उपस्थित होते.