नाशिक: निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार जिल्ह्यात मतदारयादी पुर्नरिक्षण मोहीम राबविली जात असून या विशेष मोहिमेला मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. नवीन नावनोंदणीबरोबरच यादीतील दुबार नावे वगळण्याबाबत मतदारांकडून अर्ज भरून दिले जात आहे, तर ऑनलाईन अशा प्रकारचे अर्ज करणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. ५ डिसेंबरपर्यंत देण्यात आलेल्या मुदतीत जवळपास १२ हजार मतदारांनी यादीतील आपले दुबार नाव वगळावे, असे अर्ज भरून दिले आहेत.
जिल्ह्यातील मतदारयादी शुद्ध असावी यासाठी निरंतर प्रक्रिया राबविली जात असून, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मोहीमदेखील घेतली जात आहे. या मोहिमेमध्ये मतदारांपर्यंत पोहचून त्यांना नावनोंदणी तसेच अन्य बदलांसाठी आवाहन करण्यात येत असून त्यानुसार प्रतिसाद देखील मिळत आहे. मतदारयादीत नाव समाविष्ट करणे, नाव वगळणी, नावात दुरूस्ती, तसेच पत्ता बदल करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली असून, ५ डिसेंबरपर्यंत मतदारांना संबंधित मतदार नोंदणी अधिकारी किंवा सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात दावे व हरकती स्वीकारण्यात आल्या आहेत.
फॉर्म ६ नुसार नवीन नोंदणीसाठी अर्ज : ६००७१
फॉर्म ७ नुसार वगळण्यासाठी अर्ज : १२५३२
फॉर्म ८ नुसार दुरूस्तीसाठी अर्ज : ४५१८
फॉर्म ६(अ) दुरूस्तीसाठी अर्ज : ३०६४
नवीन मतदार होण्यासाठी ६० हजार अर्ज
वयाची अठरा वर्ष पुर्ण केलेल्या नवमतदारांकडून यादीसाठी प्रतिसाद वाढत असून नाशिक जिल्ह्यातील शहरी भागातून तरुणांकडून नवीन मतदारांचे अर्ज भरून घेण्याची संख्या मोठी आहे. तालुकानिहाय आकडेवरीवरून नवमतदार पुढे आल्याचे दिसून येत आहे. नांदगाव, मालेगाव, बागलाण, चांदवह, येवला, निफाड, देवळाली या मतदारसंघातूनही नवीन मतदारांची संख्या वाढत असल्याचे दिसते.
५ जानेवारीला होणार अंतिम मतदार यादी प्रसिद्ध
मुख्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यात मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आला असून १ नोव्हेंबर ते ५ जानेवारी २०२२ या कालावधी पर्यंत अंतिम कार्यक्रम राबविला जाणार आहे. १ नोव्हेंबर रोजी एकत्रिक प्रारुप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली. १ नोव्हेंबर ते ५ डिसेेबर या कालावधीत दाव व हरकती स्विकारण्यात आल्या आहेत. २० डिसेंबर पर्यंत दावे व हरकती निकाली काढण्याचा कालावधी आहे. तर ५ जानेवारी रोजी मतदारयादीची अंतिम प्रसिद्धी केली जाणार आहे.