मालेगाव : येथील जिल्हा सत्र न्यायालयात येत्या ९ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या अदालतीत तालुक्यातील पक्षकारांनी जास्तीत जास्त प्रलंबित खटले निकाली काढावेत, असे आवाहन जिल्हा सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष सूर्यकांत शिंदे यांनी येथे केले. येथील अपर जिल्हा सत्र न्यायालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालत संदर्भात मार्गदर्शन कार्यक्रमात न्या. शिंदे बोलत होते. व्यासपीठावर मुख्य न्याय दंडाधिकारी सत्यवान डोके, जिल्हा न्यायाधीश एस. एम. अली, मालेगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष एस. एस. देवरे उपस्थित होते. न्या. शिंदे पुढे म्हणाले की, मालेगावचे लोकन्यायालयात खूप मोठे योगदान आहे. प्रत्येक वकिलाने प्रकरणे निकाली काढावेत तसेच जिल्हाभरातील महावितरण कंपनीचे सर्वात जास्त खटले प्रलंबित आहेत. सदर खटले मार्गी लावण्यासाठी पुढाकार घ्यावा. जेणे करून आपला पैसा, वेळ, श्रम व मानसिक त्रास संपवून आपली न्यायालयीन लढ्यातून कायमची सुटका करून घ्यावी, असे आवाहन न्या. शिंदे यांनी केले. या कार्यक्रमास यशवंत मानकर, मलिक शेख, आर. के. बच्छाव, पी. व्ही. दातार, जे. के. पाटील, एस. के. वाणी, के. एस. तिसगे, के. डी. भामरे, मोती जगताप, राकेश बागुल आदींसह बार असोशिएशनचे सदस्य व वकील उपस्थित होते. बी. एल. लोखंडे यांनी सूत्रसंचालन केले. अनिता पवार यांनी आभार मानले.
लोकअदालतीत खटले निकाली काढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 10:52 PM