-संकेत शुक्ल, नाशिकशासनाने तत्काळ छत्रपती संभाजीनगरातील औरंगजेबाची कबर हटवावी, अन्यथा नाशिकचे कारसेवक या कबरीच्या दिशेने कूच करत ती उद्ध्वस्त करतील, असा इशारा देत विश्व हिंदू परिषदेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांना निवेदनही सादर केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
विश्व हिंदू परिषदेने औरंगजेबाची कबर हटवा अशी मोहीम सुरू केल्यानंतर आता त्याचे पडसाद नाशिक जिल्ह्यात दिसू लागले आहेत. बजरंग दलातर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर औरंगजेबाची कबर हटविण्यासाठी निदर्शने करण्यात आली.
"औरंगजेबाची कबर यातनांचे प्रतीक, कारण..."
निवेदनात म्हटले आहे की, उझबेगी परकीय आक्रमक बाबर याचा वंशज औरंगजेब याची कबर छत्रपती संभाजी महाराज नगर या शहरात आहे. वास्तविक औरंगजेबाचा मृत्यू अहिल्यादेवी नगर येथे झाला व नतंर या ठिकाणी त्याची कबर करण्यात आली. याच औरंगजेबाने शिख गुरू तेगबहादूर यांची हत्या केली होती. काशी विश्वेश्वराचे मंदिर याने फोडले, मथुरेच्या मंदिराचा यानेच विध्वंस केला. सोरटी सोमनाथाचे मंदिरही त्याने उद्ध्वस्त केले. त्र्यंबकेश्वर मंदिर, जेजुरी गड यावर हल्ले केले. हजारो हिंदूंची क्रूर कत्तल केली. अशा क्रूरकर्मा व आततायी औरंगजेबाचे कुठलेही स्मारक अथवा कबर स्वतंत्र भारत देशात यातनांचे प्रतीक आहे. त्यामुळे ही कबर पूर्णपणे नष्ट करावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दलाने केली आहे.
त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी बजरंग दल महानगर संयोजक श्रीकांत क्षत्रिय, विश्व हिंदू परिषद विभाग मंत्री अनिल चांदवडकर, नासिक जिल्हा मंत्री योगेश बहाळकर, सह मंत्री अमृत सदावर्ते, पंकजराज अटल, सागर वाघ, विशाल शर्मा, कृष्णा साखला, गौरव गवळी, सौरभ पाटील, केदार जोशी, मोहित चौधरी, सचिन ढोले, प्रशांत लोणारी, ऋषिकेश काळे, सुमित पाटोळे, आदी उपस्थित होते.