सिडको : दोन वर्षाच्या चिमुरडीचा पतंग उडविण्याचा हट्ट पुरविण्यासाठी झाडावर अडकलेली पतंग काढताना लगतच्या विहिरीत तोल जाऊन मातेचा चिमुरडीदेखत करुण अंत झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी (दि.१५) दुपारच्या सुमारास सिडको भागात घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शिवाजी चौक परिसरात असलेल्या खोडे मळ्यात आदिवासी महिला मनीषा विजय पवार (२०) या कुटुंबासमवेत रखवालीसाठी वास्तव्यास आहे. दुपारी चार वाजेच्या सुमारास मनीषा यांची दोन वर्षाची चिमुरडी मळ्यामध्ये पतंग उडविण्याचा आनंद घेत होती. तिच्यावर लक्ष ठेवण्यासाठी मनीषा यादेखील तिच्यासोबत होत्या. दरम्यान, झाडावरील पतंग पकडण्याच्या नादात मनीषा यांचा तोल गेला आणि झाडाला लागून असलेल्या विहिरीमध्ये त्या पडल्या. आई विहिरीत पडल्याचे लक्षात येताच चिमुरडीने आक्रोश केला; मात्र मळ्याचा परिसर निर्जन असल्यामुळे तिचा मदतीचा आक्रोश क ोणाच्याही कानी पडू शकला नाही. दुर्दैवाने मदतीसाठी कोणीही येऊ शकले नाही, त्यामुळे विहिरीच्या पाण्यात गटांगळ्या खाऊन मनीषा यांचा मृत्यू झाला. सदर प्रकार एका झोपडीवजा घरात राहणाऱ्या मनीषाच्या आईच्या निदर्शनास आला. त्या वृद्ध मातेने विहिरीच्या दिशेने धाव घेत मुलीला पाण्यात पडल्याचे बघून हंबरडा फोडला. यावेळी परिसरातील काही नागरिक धावून आले व त्यांनी तत्काळ अंबड पोलीस ठाण्याला व सिडको अग्निशामक केंद्राला सदर घटनेची माहिती दिली. मात्र तो पर्यंत उशीर झाला होता. अंबड पोलिसांनी मयत महिलेच्या मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला. याबाबत मयताची आई यशोदा मधू कडाळे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
पतंग काढताना आईचा चिमुरडीदेखत करुण अंत
By admin | Published: January 16, 2017 1:47 AM