सिन्नर : तालुक्यातील वावी गावचे ग्रामदैवत श्री कानिफनाथ महाराज मंदिराचा लोकवर्गणीतून जीर्णोद्धार करण्यात आला असून, कानिफनाथ महाराज व दत्त महाराज मूर्तीप्राण प्रतिष्ठेनिमित्त सोमवारपासून (दि. १९) तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ओम श्री चैतन्य कानिफनाथ महाराज मित्रमंडळाने दिली आहे. वावी गावाच्या पूर्वेला कानिफनाथ महाराजांचे प्राचीन दगडी मंदिर होते. मंदिर जुने झाल्याने कानिफनाथ महाराज मित्रमंडळ व ग्रामस्थांनी मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला. अनेक दानशूर व्यक्ती मंदिराच्या कामासाठी पुढे आली. लोकवर्गणीतून मंदिराची नव्याने उभारणी करण्यात आली आहे. मंदिराचा पुढे आकर्षक सभामंडप उभारण्यात आला. मार्बल लावून गाभारा तयार करण्यात आला. कळसाचे कामही अतिशय सुबक व आकर्षक झाले आहे. मंदिराच्या सभोतालचा परिसर सुशोभित करण्यात येत आहे. सोमवारपासून मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (दि. १९) सकाळी ८ ते ५ वाजेपर्यंत पुण्यहवन वाचन, मातृका मंडल, योगिनी मंडल, नांदिश्राद्ध, प्रथमेश आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री ८ वाजता तुकाराम महाराज वावीकर यांचे कीर्तन होणार आहे. मंगळवारी (दि. २०) सकाळी ८ वाजता स्थापित मंडल, नऊ ग्रह मंडल, रुद्र मंडल, शत्रपाल मंडल स्थापना, सायंकाळी ५ वाजता मूर्ती व कळस मिरवणूक, रात्री ८ वाजता वैराग्यमूर्ती भागवताचार्य बबन महाराज गाडेकर यांचे कीर्तन होणार आहे.बुधवारी (दि. २१) सकाळी ७ वाजता अग्निस्थापन, हवन होणार आहे. त्यानंतर सकाळी साडेअकरा वाजता प. पू. महंत रमेशगिरीजी महाराज (कोपरगाव आश्रम) यांच्या हस्ते मूर्ती व कलश स्थापना व पूर्णाहुती होणार आहे. यावेळी कीर्तनकेशरी पांडुरंगगिरी महाराज वावीकर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. या विविध धार्मिक कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन ओम चैतन्य कानिफनाथ महाराज मित्रमंडळ व ग्रामस्थांनी केले आहे.
कानिफनाथ मंदिराचा लोकवर्गणीतून जीर्णोद्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 12:33 AM