नाशिक : स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने कनव्हर्जन अंतर्गत पुरातत्त्व खात्याच्या वतीने सुंदरनारायण मंदिराचे नूतनीकरण आणि संवर्धनाचे राबविण्यात येत असलेले काम नागरिकांनी बंद पाडले आहे. संपूर्ण मंदिराचे दगड बदलण्याची नागरिकांची मागणी असून, ठेकेदार तयार नसल्याने वाद निर्माण झाला आहे. स्मार्ट सिटी कंपनीची बैठक आणि वार्षिक सभा होत असतानाच ही सलामी मिळाली आहे.अर्थात, कंपनीचे संचालक आणि कॉँग्रेसचे गटनेता शाहू खैरे यांनी शुक्रवारी (दि. २८) हा विषय मांडला आहे. तथापि, त्यावर कोणत्याही प्रकारचा ठोस निर्णय कंपनीच्या बैठकीत झालेला नाही. स्मार्ट सिटी अंतर्गत कनव्हर्जनचा भाग म्हणून पुरातत्त्व खात्याने नाशिकच्या सुंदरनारायण मंदिराच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले आहे. सदरचे मंदिर हे चारशे वर्षांपूर्वीचे असून, पुरातत्त्व खात्याने संग्रहित केले आहे. त्यामुळे नूतनीकरणाची जबाबदारी प्रामुख्याने पुरातत्त्व खात्याची आहे, त्याअनुषंगाने गेल्या वर्षभरापासून काम सुरू आहे. या मंदिराचे जीर्ण पाषाण बदलण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यासाठी ठेकेदाराने खास कारागीर बोलवून दगड घडविण्याचे काम सुरू आहे. परंतु, केवळ मंदिराचे जे दगड खराब झाले आहेत तेच बदलण्यात येतील, असे ठेकेदाराचे म्हणणे आहे. तर संपूर्ण मंदिराचे दगड बदलावे, अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे. दोन दिवसांपूर्वी यासंदर्भात नागरिकांशी ठेकेदाराचे वाद झाल्यानंतर शाहू खैरे यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. मूळ करारात काय नमूद आहे केवळ खराब झालेले दगडच बदलण्यात येणार आहेत की, सर्वच दगड बदलण्याची तरतूद आहे, यासंदर्भातील माहिती घेण्याचे काम सुरू आहे. पुरातत्त्व खात्यातील अधिकारी घारपुरे यांनी सरकारवाड्याच्या नूतनीकरणाचे काम स्वारस्य घेऊन पूर्ण केले, त्यांच्याच काळात हे काम सुरू झाले परंतु आता घारपुरे निवृत्त झाल्याने नूतन अधिकाºयांकडे पुरेशी माहिती नसल्याचे खैरे यांनी सांगितले. तर दुसरीकडे संबंधित ठेकेदार पोलीस तक्रार करण्याच्या तयारीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.केवळ खराब दगडच बदलणारसुंदरनारायण मंदिराच्या नूतनीकरणात दगड बदलण्यासाठी ठेकेदाराने खास कारागीर आणले आहेत. त्यांनी मोठ्या प्रमाणात दगड घडविले आहेत; मात्र ठेकेदाराच्या म्हणण्यानुसार केवळ खराब दगडच बदलण्यात येणार आहेत. मग, मोठ्या प्रमाणात दगड का घडविण्यात आले हा परिसरातील नागरिकांचा खरा संशयाचा मुद्दा आहे.
सुंदरनारायण मंदिराच्या नूतनीकरणाचे काम पाडले बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 1:07 AM