नाशिक : येथील प्रसिद्ध मूर्तिकार, चित्रकार, रांगोळीकार म्हणून ओळखले जाणारे नारायणराव पांडुरंग चुंबळे ऊर्फ चुंबळे काका (८५, रा. चव्हाटा, जुने नाशिक) यांचे मंगळवारी (दि.२५) निधन झाले. त्यांच्या रूपाने नाशिककरांनी आदर्श चित्रकार गमावल्याची खंत बोलून दाखविली.
शरणपूर रोडवरील राजीव गांधी भवनाच्या द्वारासमोर ते थोर राष्ट्रपुरुषांच्या जयंती, पुण्यतिथीला आकर्षक रांगोळी, चित्रे रेखाटत असत. याठिकाणी चित्रे रेखाटतांना चुंबळे यांना बहुसंख्य नाशिककरांनी त्यांना पाहिले आहे. गड-किल्ले संवर्धनासाठी देखील ते अधूनमधून जात होते. किल्ले वाचवा, इतिहास वाचवा असे घोषवाक्य ते गड, किल्ल्यांवरील दगडांवर लिहीत होते. राष्ट्रीय सण, उत्सवांमध्ये सहभागी होऊन ते थोर राष्ट्रपुरुषांचे रांगोळीतून चित्रे रेखाटत असे. चित्र रेखाटण्याचा त्यांचा व्यासंग मोठा होता. आयुष्यभर त्यांनी आपल्या कलेवर प्रेम केले.
त्यांच्या संग्रहात विविध गड-किल्ल्यांची रेखाटलेली चित्रे आहेत. त्यांच्या निधनाची वार्ता मंगळवारी समजताच नाशिककर हळहळले. राजीव गांधी भवनाच्या अंगणी आता राष्ट्रपुरूषांची रांगोळी सजविणारे हात राहिले नाही, अशी खंतही काही तरुण कलाकारांनी बोलून दाखविली. चुंबळे यांच्या पश्चात तीन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"