नाशिकरोड : मनपाच्या बिटको रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागाची दुरवस्था झाली असून, अनेक प्रकारच्या सोयीसुविधांचा अभाव आहे. येथील शौचालय दुरुस्तीचे काम गेल्या तीन महिन्यांपासून रखडल्याने महिला रुग्ण, नातेवाईक, महिला कर्मचारी यांची मोठी गैरसोय होत आहे. शौचालय दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी केली जात आहे.बिटको रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागात असलेले शौचालय खराब झाल्याने तीन-चार महिन्यांपूर्वी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र शौचालय व स्वच्छतागृह दुरुस्तीचे काम अत्यंत संथ गतीने होत असून मध्येच काही दिवस काम बंद पडून असते. बाह्य रुग्ण विभागातील शौचालयाचा रुग्ण, नातेवाईक, कर्मचारी, महिला सुरक्षारक्षक आदी सर्वजण वापर करतात. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून दुरुस्तीच्या कामामुळे शौचालय बंद असल्याने सर्वांचीच मोठी गैरसोय झाली आहे. विशेष करून महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्या वेळेस रुग्णाचे महिला नातेवाईक, महिला सुरक्षारक्षक आदींना वाहनतळाच्या मोकळ्या जागेत झाडाच्या आडोशाला जावे लागते. याबाबत रुग्ण, नातेवाईक, कर्मचारी यांनी वारंवार शौचालयाचे काम त्वरित पूर्ण करावे. याबाबत सांगूनसुद्धा दुर्लक्ष केले जात आहे. गोरगरीब रुग्ण, नातेवाईक यांना होणारा त्रास लक्षात घेऊन शौचालयाचे काम पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
बिटको रुग्णालय इमारतीची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 1:02 AM