सिन्नर : समृद्धी महामार्गाच्या कामामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक गावांचे पक्के रस्ते पूर्णत: खराब झाले आहेत. त्यामुळे दळणवळणाची मोठी समस्या निर्माण झाली असून पावसाळ्यापूर्वी या रस्त्यांची कामे मार्गी लावून ती पूर्ववत करावीत, अशी सूचना आ. माणिकराव कोकाटे यांनी केली.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे नाशिक येथील अधीक्षक अभियंता निघोत यांच्या कार्यालयात कोकाटे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, समृद्धीचे अधिकारी, ठेकेदार पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचे अधिकारी आदींच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
समृद्धी महामार्गाचे काम करताना संबंधित ठेकेदाराने माती, मुरूम आणि अन्य तत्सम मालाची वाहतूक करण्यासाठी ग्रामीण भागातील पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील पक्या रस्त्यांचा वापर केला आहे. अवजड वाहनांमुळे हे पक्के रस्ते पूर्णतः खराब झाले असून त्यामुळे ग्रामीण भागातील दळणवळण गैरसोयीचे झाले आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे अनेक ठिकाणी अपघात घडत असून तालुक्यातील नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे ज्या अवस्थेत समृद्धीच्या ठेकेदाराने या रस्त्यांचा वापर सुरू केला, त्याच अवस्थेत म्हणजे पूर्णत: पक्के रस्ते या ठेकेदारांनी करून द्यावेत, अशी सूचना कोकाटे यांनी एमएसआरडीसीचे अधीक्षक अभियंता निघोत यांना केली.