नाशिक : जिल्हा मध्यवर्ती बॅँकेची आर्थिक परिस्थिती खालावण्यास कारणीभूत ठरलेल्या निफाड व नाशिक सहकारी साखर कारखान्याकडील थकीत शेकडो कोटींचे कर्जवसुलीचे मोठे आव्हान नवनियुक्त अध्यक्ष केदा अहेर यांच्यासमोर उभे ठाकले असताना त्याच्या वसुलीसाठी प्रयत्न सुरू झाले असून, दोन दिवसांपूर्वी भाजपाचे ज्येष्ठ नेते सुरेशबाबा पाटील यांची अहेर यांनी भेट घेऊन निफाड येथे होऊ घातलेल्या ड्रायपोर्टसाठी निसाकाची जागा विक्री करून त्यातून बॅँकेचे कर्जवसुलीचा प्रस्ताव ठेवला आहे. जिल्हा बॅँकेचे जुने कर्जवसूल झाल्यास कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी जिल्हा बॅँक निसाकाला पुन्हा कर्ज देईल, असे आश्वासनही देण्यात आले आहे.नाशिक जिल्हा मध्यवर्ती बॅँकेला सुमारे अडीच हजार कोटी रुपयांचे थकीत कर्जवसूल करायचे असून, त्यासाठी बॅँकेचे अध्यक्ष व संचालकांनी कंबर कसली आहे. अध्यक्ष केदा अहेर यांनी तालुकानिहाय थकबाकीदार शेतक-यांच्या बैठका घेऊन कर्ज परतफेडीचे आवाहन करण्याबरोबरच ऐपतदार कर्जदारांची मालमत्ता जप्त करण्याची कार्यवाहीही सुरू करण्यात आली आहे. जिल्हा बॅँकेच्या थकीत कर्जात नाशिक सहकारी साखर कारखाना व निफाड सहकारी साखर कारखान्याची रक्कम अधिक आहे. मध्यंतरी नासाकाची जप्त मालमत्ता लिलावात विक्री करण्यासाठी बॅँकेने पावलेही उचलली होती, तशीच परिस्थिती निफाड कारखान्याची झाली आहे. नासाकाकडून सध्या तरी कर्जाची परतफेड होण्याची चिन्हे नाहीत, मात्र निफाड सहकारी कारखान्याबाबत जिल्हा बॅँकेला आशा लागून आहे. केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी निफाड येथे ड्रायपोर्ट उभे करण्याची घोषणा केली असून, या ड्रायपोर्टसाठी निफाड कारखान्याच्या ताब्यात असलेली शेकडो एकर जमिनीपैकी काही जागेची त्यासाठी निवड करण्यात आली आहे. मात्र निसाकावर जिल्हा बॅँकेचे कर्ज असल्याने कारखान्याची मालमत्ता बॅँकेकडे तारण असल्याने ड्रायपोर्टसाठी जागा हस्तांतरण करताना तांत्रिक अडचणी उभ्या राहू शकतात. त्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी अध्यक्ष केदा अहेर यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते सुरेशबाबा पाटील यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली. सुरेशबाबा पाटील हे नितीन गडकरी यांचे सल्लागार मानले जातात, ड्रायपोर्टचा प्रकल्प गडकरी यांचाच असून, केंद्र सरकार त्यासाठी निधी उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे अहेर व पाटील यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे. ड्रायपोर्टसाठी कारखान्याची जागा देऊन बदल्यात मिळणारे पैसे जिल्हा बॅँकेच्या कर्जखात्यात वर्ग करून कारखान्याला ‘निल’ करण्याची त्यामागे योजना आहे.
निफाड साखर कारखान्याची जागा ड्रायपोर्टला विकून कर्जाची फेड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 6:45 PM
नाशिक जिल्हा मध्यवर्ती बॅँकेला सुमारे अडीच हजार कोटी रुपयांचे थकीत कर्जवसूल करायचे असून, त्यासाठी बॅँकेचे अध्यक्ष व संचालकांनी कंबर कसली आहे. अध्यक्ष केदा अहेर यांनी तालुकानिहाय थकबाकीदार शेतक-यांच्या बैठका घेऊन कर्ज परतफेडीचे आवाहन करण्याबरोबरच ऐपतदार कर्जदारांची मालमत्ता जप्त करण्याची कार्यवाहीही सुरू करण्यात आली आहे.
ठळक मुद्देअहेर-पाटील बैठक : कारखाना सुरू करण्याचेही प्रयत्न पैसे जिल्हा बॅँकेच्या कर्जखात्यात वर्ग करून कारखान्याला ‘निल’ करण्याची त्यामागे योजना आहे.