देवळा : देवळा येथील मुद्रांक घोटाळ्यासह नाशिक येथील दुय्यम निबंधक कार्यालयातून गहाळ झालेल्या अभिलेखाबद्दलचे पडसाद शुक्रवारी (दि.५) विधिमंडळाच्या अधिवेशनात उमटल्याने या प्रकरणातील तपास कार्याला अधिक गति येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुय्यम निबंधक श्रेणी-१, कार्यालय देवळा येथे एकाच क्रमांकाचे दोन मुद्रांक वापरुन बनावट खरेदीखत तयार करण्यात आल्याचे प्रकरण राज्यभर गाजत असून शुक्रवारी विधानसभेतही त्यावर चर्चा झाली. महिनाभरापूर्वी सदरचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्याचा तपास करण्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभागाने देवळा येथे दुय्यम निबंधक कार्यालयात चौकशीसाठी त्रिसदस्यीय पथक पाठविले होते. पथकाने केलेल्या चौकशीत कार्यालयीन अभिलेखात बनावट दस्तऐवज समाविष्ट करुन त्याची प्रमाणित प्रत दुय्यम निबंधक श्रेणी-१,देवळा या कार्यालया मार्फत देण्यात आल्याचे स्पष्ट झाले. तपास सुरळीत व्हावा यासाठी मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांनी देवळा येथील तत्कालिन दुय्यम निबंधक प्रकाश गांगोडे यांचा पदभार काढून घेण्याची कार्यवाही करून माधव महाले यांच्याकडे दुय्यम निबंधकपदाचा पदभार सोपविला होता. दवंगे यांनी महाले यांना सदर प्रकरणातील दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. शासनाच्यावतीने महाले यांनी देवळा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर त्यांच्याकडून पदभार काढून घेत स्वप्निल बिरकुरवार यांच्याकडे सध्या दुय्यम निबंधक पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. देवळा तालुक्यातील बनावट मुद्रांक प्रकरणातील फरार संशयित चंद्रकांत ऊर्फ गोटु वाघ ह्या मुद्रांक विक्रेत्याचा परवाना निलंबित करण्याची कारवाई नोंदणी व मुद्रांक विभागाने केली असून त्याच्याकडील मुद्रांक साठा,नोंदवह्या व मूळ परवाना जप्त करण्यात आले आहेत. दि.१३ फेब्रुवारी रोजी मुद्रांक विक्रेता चंद्रकांत देवाजी वाघ व इतर याचेवर देवळा पोलीस ठाण्यात भारतीय नोंदणी अधिनियम १९०८ चे कलम ८२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून चंद्रकांत वाघ हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. नोंदलेल्या दस्तावेजांबाबत चिंता आपले महत्वाचे दस्तऐवज दुय्यम निबंधक कार्यालयात सुरक्षित नसल्याची बाब समोर आल्यामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, मुद्रांक घोटाळ्यातील प्रमुख संशयित अद्यापही पोलिसांच्या हाती लागत नसल्याने तपास कार्याबाबतही शंका उपस्थित होत आहेत.
देवळ्यातील मुद्रांक घोटाळ्याचे विधानसभेत पडसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2021 1:20 AM
देवळा येथील मुद्रांक घोटाळ्यासह नाशिक येथील दुय्यम निबंधक कार्यालयातून गहाळ झालेल्या अभिलेखाबद्दलचे पडसाद शुक्रवारी (दि.५) विधिमंडळाच्या अधिवेशनात उमटल्याने या प्रकरणातील तपास कार्याला अधिक गति येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ठळक मुद्देतपासाला गती मिळण्याची शक्यता; चौकशीत बनावट मुद्रांकांचा वापर उघड