नाशिक: शहर पोलीस आयुक्तपदाची सुत्रे २१ एप्रिल रोजी संध्याकाळी आयुक्तालयात हाती घेतली होती. जेमतेम नऊ महिनेही पूर्ण होत नाही तोच नाईकनवरे यांची राज्य शासनाच्या गृह विभागाने बदली केली आहे. तसेच नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांचीही बदली करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची नाईकनवरे यांच्या रिक्त झालेल्या पदावर नियुक्ती, तर पुण्याचे पोलीस महनिरिक्षक सुनील फुलारी यांची शेखर पाटील यांच्या रिक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी (दि.१३) रात्री नऊ वाजेच्या सुमारास आदेश काढण्यात आले.नाशिक शहराच्या पोलीस आयुक्तपदाची सुत्रे कोरोनाच्या काळात हाती घेणारे दिपक पाण्डेय यांचा कार्यकाळ त्यांच्या धडाडीच्या आदेशांमुळे चांगलाच गाजला. ‘गुन्हेगारीचा रोग जसा, तसे औषध देईल’ असा इशारा देत त्यांनी भूमाफियांचे धाबे दणाणून सोडले होते. २०एप्रिल २०२२ रोजी त्यांची बदली मुंबईत करण्यात आली. त्यांच्या रिक्तपदावर नाईकनवरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. नऊ महिन्यांतच नाईकनवरे यांच्या बदलीचे आदेश पारित झाल्याने नाशिककरांना एकप्रकारे धक्काच बसला.या कालावधीत नाईकनवरे यांनी शहराच्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तसेच वाहतुकीला शिस्त लावण्याकरिता वेगवेगळ्या उपाययोजनांची आखणी करण्यास सुरुवातही केली होती; मात्र अंमलबजावणीसाठी त्यांना पुरेसा वेळ मिळाला नाही. काही दिवसांपुर्वीच नाशिक पोलीस आयुक्तालयातील उपायुक्त दर्जाचे अधिकाऱ्यांची बदली झाली. तसेच नाशिक ग्रामिणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांचीही बदली करण्यात आली.नाशिकला शहाजी उमाप यांच्या रुपाने नवे पोलीस अधिक्षक मिळाले. तसेच नाईकनवरे यांच्या बदलीमुळे अंकुश शिंदे नवे पोलीस आयुक्त तर शेखर पाटील यांच्या बदलीने सुनील फुलारी नवे विशेष पोलीस महानिरिक्षक नाशिकला मिळाले आहेत.यामुळे आता नाशिक पोलीस दलाची सुत्रे नव्या अधिकाऱ्यांच्या हाती देण्यात आली आहेत. यामुळे नाशिकमधील कायदासुव्यवस्था अधिकाधिक भक्कम होईल, असा आशावाद नाशिककरांकडून व्यक्त केला जात आहे.
नऊ महिन्यांतच जयंत नाईकनवरे यांची बदली; अंकुश शिंदे नाशिकचे नवे पोलीस आयुक्त
By अझहर शेख | Published: December 13, 2022 10:48 PM