नाशिक : जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची बदली लांबण्याची शक्यता वर्तविली जात असतानाच मंत्रालयाने बुधवारी (दि. ९) नाशिकचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून गंगाधरन डी यांच्या नियुक्तीचे आदेश काढले. गंगाधरन हे २०१३ च्या आयएएस बॅचचे अधिकारी असून, मंत्रालयात ते मुख्य सचिवांचे उपसचिव म्हणून कार्यरत होते. तसेच धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही त्यांनी कामकाज पाहिले आहे. दरम्यान, मांढरे यांची पुणे येथील शिक्षण आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली असल्याचे समजते. पुणे जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कामकाज पाहत असताना १२ मार्च २०१९ रोजी सूरज मांढरे यांची नाशिक जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली होती. जिल्ह्याची सूत्रे घेऊन त्यांना तीन वर्षे पूर्ण होत असल्याने त्यांच्या बदलीची चर्चा सुरू झाली होती. मात्र, त्यांची बदली आणखी एक महिना लांबण्याची शक्यता वर्तविली जात असतानाच बुधवारी त्यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले. गंगाधरन डी हे २०१४ मध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून जिल्ह्यात कळवण प्रांत म्हणून रुजू झाले होते. आता आठ वर्षांनंतर त्यांच्याकडे जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी आली आहे. १९ मे २०१७ मध्ये धुळे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झाले होते. १६ जुलै २०१९ रोजी धुळे जिल्हाधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली हाेती. १३ मार्च २०२० रोजी त्यांची मंत्रालयात बदली करण्यात आली होती. आता त्यांच्याकडे नाशिकच्या जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तीन वर्षे पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिल्याने मांढरे यांच्याही बदलीची चर्चा सुरू होती. अखेर बुधवारी राज्य शासनाने नऊ आएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी जाहीर केली. त्यानुसार नाशिक जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या जागेवर गंगाधरण डी यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले.
--इन्फो--
मांढरे यांची कारकीर्द
- १२ मार्च २०१९ मध्ये नाशिक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती
- मालेगावमधील काेरोना नियंत्रणात आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका
- सेवा हमी कायद्यात १०१ सेवा देणारा राज्यातील पहिला जिल्हा
- कोरोनात अनाथ झालेल्या पालकांचे पालकत्व
- माझी वसुंधरा उपक्रमात राज्यात उल्लेखनीय कामगिरी
- लॉकडाऊन काळात व्हॉट्सॲपवर तक्रार निवारण
--इन्फो--
गंगाधरण डी यांची कारकीर्द
- नाशिक जिल्ह्यातील कळवण येथे प्रशिक्षणार्थी प्रांताधिकारी
- धुळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी
- १९ मे २०१७ धुळे जिल्हाधिकारी पदी नियुक्ती
- १६ जुलै २०१९ रोजी धुळे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त
- वसई-विरार मनपा आयुक्त
- १३ मार्च २०२० मंत्रालयातील मुख्य सचिव कार्यालयात बदली.