निफाड : येथील कन्हैया माऊली वारकरी शिक्षण संस्थेने विद्यार्थ्यांच्या मदतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती करण्यासाठी निफाड बसस्थानकासमोर कोरोना राक्षसाची प्रतिकृती बसवून सामाजिक बांधिलकी जपण्याचा अनोखा प्रयत्न केला आहेनिफाड येथे उगाव रोडवर कन्हैया माऊली वारकरी शिक्षण संस्थेचे संचालक म्हणून ह. भ. प राजेंद्र महाराज थोरात व ह. भ. प मंजुश्रीताई थोरात हे काम पाहतात. या दाम्पत्याकडून विद्यार्थ्यांना कीर्तन, प्रवचनाचे मार्गदर्शन तसेच टाळ, पखवाज , हार्मोनियम, वाजविणे आदी शिक्षण दिले जाते. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून आपण जनजागृती करावी अशी संकल्पना थोरात दाम्पत्याच्या मनात आली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने जुने बांबू, जुन्या साड्या, जुन्या तारा , पेपर, आदी वस्तूंचा वापर करुन कोरोना राक्षसाची प्रतिकृती बनविली. सोमवार दि.२७ रोजी निफाड येथील बसस्थानकासमोर निफाड पिंपळगाव बसवंत रस्त्याच्या दुभाजकाच्या मधोमध ही प्रतिकृती बसवण्यात आली. या प्रतिकृतीवर हारेगा कोरोना ,जितेगा भारत ,गरजूंना मदत करा अशा घोषवाक्य रंगविण्यात आली आहेत. कोरोनाचा चीनमध्ये जन्म झाला , इटलीमध्ये तो मोठा झाला, स्पेनमध्ये तो खेळला ,अमेरिकेत तो वाढला मात्र त्याच्यावर अंत्यसंस्कार भारतातच करू असा आत्मविश्वास देणारा मजकूर या कोरोना राक्षसाच्या प्रतिकृतीवर लिहिल्याने हा मजकूर सर्वाना बळ देणारा ठरत आहे.