विजय मोरे, नाशिक़शासकीय कार्यालये, सहकारी, खासगी संस्थांमधील भ्रष्टाचार कमी व्हावा यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे़ त्यासाठी १०६४ हा टोल फ्री क्रमांकही सुरू करण्यात आला़ नाशिकला पोलीस अधीक्षक असलेल्या प्रवीण पवार यांनी अधिकाऱ्यांना तक्रारदाराच्या घरापर्यंत पोहोचविले, तर नव्याने बदलून आलेले पोलीस अधीक्षक डी़ पी़ प्रधान यांनी स्वत:चा मोबाइल नंबर तक्रारदारांसाठी खुला करून आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे़ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक प्रवीण पवार यांची नुकतीच बदली झाली असून, त्याच्या जागेवर डी़ पी़ प्रधान हे बदलून आले असून, शनिवारी त्यांनी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली़ डॉ़ शशिकांत महावरकर यांनी पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकर यांना रंगेहाथ पकडून संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिली होती़ यामुळे तक्रारदारांमध्ये एक धारिष्ट्य निर्माण झाले होते़ पोलीस अधीक्षक प्रवीण पवार यांनी त्यांच्या कार्यकाळात १०६४ हा टोल फ्री क्रमांकाचा प्रसार तसेच तक्रारदाराचा त्रास वाचावा यासाठी आपल्या अधिकाऱ्यांना तक्रारदारांच्या घरापर्यंत जाण्यास सांगितले़ त्याचा फायदा होऊन नाशिक विभागात सर्वाधिक यशस्वी सापळे झाले़ नाशिक विभागाच्या पोलीस अधीक्षकपदी डी़ पी़ प्रधान आले असून, त्यांनी तक्रारदारांसाठी स्वत:चा व आपले सहकारी यांचा वैयक्तिक मोबाइलनंबर खुला करून दिला आहे़ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा दूरध्वनी, टोल फ्री क्रमांक यावर तक्रार केल्यानंतर एक प्रकारची अनामिक भीती तक्रारदारांमध्ये असते़ ती म्हणजे फोनवर योग्य माहिती मिळेल का? तक्रारीची दखल घेतली जाईल का? लाचखोरावर कारवाई होईल का? तक्रारदाराच्या नावाबाबत गुप्तता पाळली जाईल का? असे नानाविध प्रश्न असतात़ तसेच काही ठिकाणी त्वरित पैशांची मागणी केली जाते़ तेव्हा तिथे तत्काळ पोहोचणे गरजेचे असते़ मात्र तसे होत नाही, वैयक्तिक नंबरवर दिल्यानंतर तक्रारदारामध्ये एक प्रकारचा विश्वास निर्माण होईल, असे प्रधान यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)
लाचखोरांची तक्रार करा थेट पोलीस अधीक्षकांकडे
By admin | Published: May 19, 2015 1:06 AM