नाशिक : बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता पी़ वाय़ देशमुख यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त जानोरी विमानतळावर आयोजित करण्यात आलेल्या साग्रसंगीत पार्टीत केवळ ५४ मद्याच्या बाटल्या खरेदी करण्यात येऊन त्यापैकी अडीच बाटल्या शिल्लक असल्याची नोंद राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे़ या पार्टीत रिचवले गेलेले व शिल्लक असलेल्या मद्याचा संपूर्ण तपशील राज्य उत्पादन शुल्क विभाग मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करणार असून, त्यांच्या आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे़ राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार या पार्टीसाठी १२ हजार ५० रुपये भरून या पार्टीसाठी एक दिवसाची मद्यप्राशनाची परवानगी घेण्यात आली होती़, तर पार्टीतील ७८ लोकांना एक दिवसाच्या मद्यप्राशन परवान्याचे वाटप करण्यात आले होते़ पार्टी संपल्यानंतर खरेदी केलेले, पिलेले व शिल्लक असलेल्या मद्याचा अहवाल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे द्यावा लागतो़ त्यानुसार सोमवारी हा अहवाल देण्यात आला असून, हा अहवाल उद्या जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला जाणार आहे़ दरम्यान, या पार्टीची परवानगी ही एका बांधकाम व्यावसायिकाने मागितल्यानुसार देण्यात आली असून, राज्य उत्पादन शुल्क विभाग शासकीय जागेवर अशा प्रकारे मद्यप्राशनाची परवानगी देऊ शकते का, हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहतो आहे.
उत्पादन शुल्कचा आज जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल
By admin | Published: February 03, 2015 12:46 AM