वणी : येथील भरवस्तीत असणाऱ्या गोठ्यांमुळे गंभीर स्वरूपाचे संसर्गजन्य साथीचे रोग होण्याची भीती आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. परिसरातील रहिवाशांनी तालुका आरोग्य अधिकारी व वणी ग्रामपालिकेला पुढील कारवाई करण्यासाठी लेखी पत्र दिल्याने ग्रामपालिकेच्या भूमिकेकडे आता लक्ष लागले आहे. येथील नागरी वस्तीत गेल्या अनेक दिवसांपासून प्रशासकीय व्यवस्थांना आव्हान देत गोठा सुरू करण्यात आला आहे. याबाबत अनेकदा परिसरातील रहिवासी व गोठामालक यांच्यात शाब्दिक चकमक झाली आहे. अखेर येथील रहिवाशांनी वणी ग्रामपालिका, तालुका आरोग्य अधिकारी व वणी कार्यक्षेत्राचा समावेश असणाऱ्या पांडाणे प्राथमिक आरोग्य अधिकाऱ्याकडे लेखी स्वरूपात तक्रार केली. आरोग्य विभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता सार्वजनिक रस्त्यावर मलमूत्र वाहताना निदर्शनास आले, तसेच या ठिकाणी दुर्गंधी पसरल्याने याची दखल घेत वणी ग्रामपालिकेला याबाबत लेखी स्वरूपात कळवून मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया अशा साथीच्या रोगांची शक्यता वर्तविली. दरम्यान, वणी ग्रामपालिकेनेही गोठेचालकांना लेखी समज दिली. मात्र जीवघेण्या आजारास कारणीभूत ठरणाऱ्या उत्पत्तीस्थानावर नियंत्रणासाठी सदर गोठे कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी तक्रारदारांनी केली आहे. (वार्ताहर)
गोठा धोकादायक असल्याची तक्रार
By admin | Published: September 08, 2015 11:05 PM