नाशिक : सुरगाणा धान्य घोटाळा प्रकरणी शासनाने नेमलेल्या पाच सदस्यीय चौकशी समितीचा अहवाल गुरुवारी (दि. ११) मॅटसमोर सादर करण्यात आला, तसेच अधिकाऱ्यांचाही युक्तिवाद ऐकण्यात आला. राज्य शासनाचा अहवाल सादरकर्ता प्रतिनिधी नसल्याने त्याचे म्हणणे शुक्रवारी (दि. १२) ऐकल्यानंतरच मॅट या प्रकरणी निर्णय देणार आहे. सात तहसीलदारांच्या निलंबनाला मॅटमध्ये आव्हान देण्यात आल्याने त्यावर बुधवारी सुनावणी झाली. तहसीलदारांनी अपील दाखल केल्यानंतर मॅटने सरकारला म्हणणे सादर करण्याची सूचना केली. त्यावेळी सरकारने या साऱ्या प्रकरणाची येत्या १५ दिवसांत उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करण्यात येणार असल्याचे प्रतिज्ञापत्र मॅटसमोर सादर केले होते. त्यावर तहसीलदारांच्या वतीने बाजू मांडताना त्यांच्या वकिलांनी या चौकशी समितीचा अहवाल मॅटसमोर सादर करण्याची मागणी केली होती. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या पाच सदस्यीय समितीचाअहवाल गुरुवारी (दि. ११) मॅटसमोर सादर करण्यात आला; मात्र अहवाल सादरकर्ता नसल्याने त्याचे म्हणणे शुक्रवारी ऐकून घेतल्यानंतर मॅट निर्णय देणार आहे. त्यामुळे शुक्रवारच्या मॅटच्या निकालाकडे निलंबित तहसीलदारांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
शासनाकडून मॅटसमोर अहवाल
By admin | Published: June 12, 2015 1:54 AM