ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील वाहतूक शाखेत २०१६-२०१७ साली श्यामकुमार निपुंगे हे सहायक पोलीस आयुक्तपदी कर्तव्यावर होते. परमवीर सिंग यांनी आपल्या आयुक्तपदाचा दुरुपयोग करीत त्यांची तडकाफडकी बदली केली. तसेच २०१७ साली सुभद्रा पवार या महिला पोलिसाचा तिच्या प्रियकराकडून खून करण्यात आला; मात्र या खुनाच्या प्रकरणाला दडपून टाकत सुभद्रा हिने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी भासवून खोटे पुरावे सादर करून न्यायालयात कलम ३०६ अन्वये आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी निपुंगे यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते. यामध्ये त्यांना शिक्षा होऊन पोलीस दलाची प्रतिमाही मलिन झाली होती.
दरम्यान, झिरवाळ यांनी पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांना दिलेल्या पत्रानुसार निपुंगे यांनी अनुसूचित जाती जमाती कायद्यान्वये १४ जून रोजी तक्रार दिल्यानंतर आडगाव पोलिसांनी अद्यापपर्यंत गुन्हा दाखल केलेला नाही. त्यामुळे ही बाब अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा कलम-४ चे उल्लंघन करणारी असून, या प्रकरणात तातडीने कार्यवाही करीत त्याचा अहवाल सादर करावा, असे आदेश पत्राद्वारे पोलीस आयुक्तांना दिले आहेत.
---कोट---
श्यामकुमार निपुंगे यांचा तक्रार अर्ज आडगाव पोलिसांनी स्वीकारला आहे; मात्र त्यांनी केलेल्या आरोपानुसार घटना ठाणे पोलिसांच्या हद्दीत घडली आहेे. त्यामुळे नाशिक पोलीस आयुक्तालयाचा काहीही संबंध नाही. याबाबत पोलीस महासंचालकांना लेखी पत्र पाठविण्यात आले असून, हा विषय नाशिक शहरात घडलेला नाही; त्यामुळे आम्ही चौकशी करू शकत नाही, असे पत्रात म्हटले आहे. तरीदेखील महासंचालकांकडून याबाबत काही आदेश प्राप्त झाल्यास तक्रार अर्जानुसार आयुक्तालयाच्या स्तरावर चाैकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल.
- दीपक पाण्डेय, पोलीस आयुक्त.