कळवणच्या मेनरोड रस्त्यांवरून गणेश मूर्ती घेऊन जाताना गणेशभक्त अमाप उत्साहात दिसून आले. रस्त्यावर गणेशमूर्ती खरेदीसाठी नेहमीसारखी गर्दी दिसून आली. शिवाय उत्साहदेखील अमाप होता. यावेळी गणेशभक्तांनी आणि कळवण शहरातील गणेश मंडळांनी नवनवीन संकल्प करून सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा निर्णय घेऊन साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना नियमांचे पालन करीत उत्साहात गणरायाच्या मूर्तीची घरी आणि मंडपात प्रतिष्ठापना करण्यात आली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी उत्सवावर कडक निर्बंध होते. मात्र, यंदा कोरोनाच्या संख्येत घट झाल्याने राज्य सरकारने नियम शिथिल करीत उत्सव साधेपणाने साजरा करण्यास परवानगी दिली आहे. याचाच एक भाग म्हणून गणेशभक्तही नियमांचे पालन करताना दिसत आहेत. बालगोपाळांनी बाप्पाचा जयघोष करीत परिसर दणाणून सोडत गणरायाचे स्वागत केले. गेल्या वर्षी तालुक्यात ९५ गावांत ‘एक गाव, एक गणपती’ बसविण्यात आले होते.