इगतपुरी : मुंबई-आग्रा महामार्गावर नवीनच टाकण्यात आलेल्या गतिरोधकाला दर्शविण्यासाठी फलक लावण्यात यावे व त्याठिकाणी हायमास्ट लाइट लावण्यात यावे या विषयाचे निवेदन रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र गुप्ता व तालुकाप्रमुख सुनील रोकडे यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरीचे तहसीलदार महेंद्र पवार यांना देण्यात आले. महामार्गावर गतिरोधक दर्शविणारे फलक व हायमास्ट लाइट येत्या आठ दिवसांत न लावल्यास रिपाइंच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.दरम्यान, इगतपुरी तालुक्यातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा महामार्गालगत पिप्रीसदो फाटा, बोरटेंभे फाटा, टाकेघोटी फाटा, घोटी-सिन्नर हायवे फाटा या ठिकाणी पूर्वीपासूनच भुयारी मार्ग व्हावा यासाठी अनेक आंदोलने व रास्ता रोको येथील ग्रामस्थांनी केले आहे. शेकडो नागरिकांचे प्राण याठिकाणी रस्ता ओलांडताना गेले आहे. मागील दोन महिन्यांपूर्वी तर एका अपघातात नांदगाव सदो येथील दोघा मायलेकरांचा रस्ता ओलांडताना एका कारने उडविल्याने जागीच मृत्यू झाला होता. त्यावेळी तेथील ग्रामस्थांनी पाच ते सहा तास महामार्ग रोखून धरल्यामुळे दोन्ही बाजूंनी वीस ते पंचवीस कि.मी.पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यावेळी त्यांना भुयारी मार्ग करण्यात येईल, असे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले. मात्र भुयारी मार्गाऐवजी महामार्गावर प्रत्येक फाट्यावर गतिरोधक टाकण्यात आले. परंतु गतिरोधक दर्शविणारे फलक नसल्याने गतिरोधक वाहनचालकांच्या लक्षात येत नसल्याने अपघातांचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना आपल्या प्राणास मुकावे लागत आहे. म्हणूनच रिपाइंचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना या विषयीचे निवेदन देण्यात आले. या निवेदनावर रिपाइंचे इगतपुरी तालुकाध्यक्ष सुनील रोकडे, जिल्हा उपाध्यक्ष तथा नगरसेवक बाळासाहेब गांगुर्डे, सामाजिक कार्यकर्ते सुनीता गोपाळे, तालुका संपर्कप्रमुख पोपट दोंदे, तालुका संघटक मंगेश रोकडे, शहराध्यक्ष मदन जाधव, जिल्हा सचिव लक्ष्मणराव कांबळे, चंद्रकांत शिंदे यांच्या स्वाक्षऱ्या आहे. (वार्ताहर)