राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना हे निवेदन पाठविण्यात आले. जग मागील दोन वर्षांपासून अधिक काळ कोरोना संसर्गमुळे त्रस्त असून, जीवनातील सर्वच क्षेत्र तथा मानवी जनजीवन विस्कळीत झाले आहे. निवेदनात म्हटले आहे, शासनाने शैक्षणिक सत्र २०२० व २१-२२ या वर्षांची संचमान्यता करण्यासाठी नुकतेच निर्देश दिले आहेत. अशा आशयाचे पत्र दिनांक ८ सप्टेंबर २०२१ रोजी महाराष्ट्र राज्याचे शिक्षक संचालक यांनी आदेश निर्गमित केले आहे. या पत्राद्वारे विद्यार्थ्यांची आधार नोंदणी अनिवार्य केली असून, जे विद्यार्थी आधार कार्डशी जोडलेले असतील त्यांचीच गणना संच मान्यतेसाठी करण्यात येईल असे सुचविण्यात आले आहे. ही नोंदणी ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत करण्याची मुदत दिलेली आहे. एकीकडे कोरोनामुळे आलेला विस्कळीतपणा आणि त्याचा कामावर झालेला दुष्परिणाम यामुळे शिक्षकांना हे कार्य करणे अवघड झालेले असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे.
शैक्षणिक सत्र २०१९-२० ची विद्यार्थी संख्या गृहीत धरूनच संचमान्यता करावी, या संच मान्यतेकरिता आधार नोंदणी सक्तीची करण्यात येऊ नये, अशी मागणी निवेदनाच्या शेवटी करण्यात आली आहे. निवेदनावर शरद शेजवळ, महेंद्र गायकवाड, विनोद पानसरे, वनिता सरोदे, शैलेंद्र वाघ, सुभाष वाघेरे, अझहर शहा, अमीन शेख, नितीन केवटे, प्रा. के. एस. केवट, वसीम शेख, पी. जे. बारे, भारती बागुल, अतुल डांगळे, दीपक शिंदे, कुलदीप दिवेकर, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.