नाशिक : इगतपुरी तालुक्यातून जाणारा प्रस्तावित समृद्धी महामार्ग रद्द करण्यात यावा, या मागणीचे निवेदन इगतपुरीतील २३ गावांच्या शेतकºयांच्या प्रतिनिधी मंडळाने मुंबईत पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन सादर केले. शासनाने जबरदस्तीने जमिनी संपादित करण्याचा प्रयत्न केल्यास सामूहिक आत्मदहनाचा इशाराही यावेळी देण्यात आला. समृद्धी महामार्गासंदर्भात इगतपुरी तालुक्यातील शेतकºयांनी गुरुवारी (दि. १४) मुंबईत महाराष्ट्राचे जलसंधारण व वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. या शिष्टमंडळाचे नेतृत्व भाजपाचे उपाध्यक्ष दिनकर पाटील यांनी केले. यावेळी पालकमंत्र्यांनी शेतकºयांचे म्हणणे ऐकून घेत लवकरच एक बैठक घेण्याचे निश्चित केले. या प्रसंगी नाशिक जिल्हा समृद्धी महामार्ग कृती समितीचे अध्यक्ष कचरू पाटील डुकरे, भाजपाचे महानगर उपाध्यक्ष अनिल भालेराव, मधुकर कोकणे, भास्कर गुंजाळ, अरुण गायकर, पांडुरंग वारुंगसे, किसनराव वाकचौरे, दौलतराव दुभाषे, ज्ञानेश्वर कडू, रतन पाटील लंगडे, मच्छिंद्र भगत, आनंदराव वाघचौरे, रघुनाथ वाघचौरे, मल्हारी मांडवे, रामेश्वर शिंदे, एकनाथ पुंडे आदींसह शेतकरी उपस्थित होते.
‘समृद्धी’बाबत शेतकºयांचे पालकमंत्र्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 12:21 AM