नाशिक : महानगरासह संपूर्ण जिल्ह्यात आलेली ही दुसरी कोरोना लाट अधिकच वेगवान असल्याने या कोरोनाच्या विषाणूला रोखण्यासाठी आता केवळ सिंगल मास्क नव्हे तर डबल मास्कची आवश्यकता निर्माण झाली आहे. सॅनिटायझेशन आणि सोशल डिस्टन्सिंग ही खबरदारी घेतानाच दिवसभर आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब अत्यावश्यक झाला आहे.
मागील वर्षी कोरोना बहरात येण्याचा कालावधी हा पावसाळा होता, तर यंदाच्या वर्षी तो उन्हाळ्यात फोफावला आहे. त्यामुळे या कालावधीत ज्या व्यक्ती घराबाहेर फिरत आहेत, त्यांनी उन्हातून घरी गेल्यानंतर लगेच फॅनखाली बसणे, कुलर, एसीत जाणे टाळावे. तसेच आहारामध्ये कोणतेही कफवर्धक पदार्थ टाळावेत. त्यात फळांमध्येदेखील सफरचंद, चिकू, केळी, सीताफळ, दही, काकडी अगदी उकडलेली अंडीदेखील टाळणे योग्य ठरेल. तसेच कोणत्याही फळांवर पाणी पिऊन आजारांना निमंत्रण देऊ नये. तसेच प्रत्येक नागरिकाने दिवसभरात किमान दोन वेळा तोंडात लवंग आणि दालचिनीचा तुकडा काही काळ चघळावा. त्याने मुखशुद्धीसह घशात कफ बनण्याची प्रक्रियाच संपुष्टात येते. त्याशिवाय घराच्या प्रत्येक खोलीच्या कोपऱ्यांमध्ये भीमसेनी कापूर दिवसभर ठेवल्यास त्याचादेखील चांगला परिणाम दिसून येतो. तसेच आरोग्यदायी जीवनशैलीनुसार दररोज सकाळी व्यायाम, योगासने आणि घरीच असल्याने गरम आणि ताजे जेवण घेणेच हितकारक आहे. तसेच काहीही लक्षणे आढळली तरी कोणतीही औषधे परस्पर घेऊ नयेत. तसेच विनाकारण कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर पडू नये, हीच काळाची गरज आहे. सध्याच्या परिस्थितीत स्वत:चा बचाव म्हणजे संपूर्ण कुटुंबाचा बचाव हाच विचार मनात ठेवून कार्यरत राहण्याची गरज आहे.
डॉ. विक्रांत जाधव
फोटो
१६डॉ. जाधव