नाशिक : वेळ रात्री दोन वाजेची. ठिकाण नाशिकमधील पळसे शिवारातील ऊसशेती. कडाक्याच्या थंडीत विहिरीत पडलेला बिबट्या सुटकेसाठी धडपडत होता. वनविभागाच्या पश्चिम कार्यालयाला माहिती मिळाली. तत्काळ रेस्क्यू टीमने निर्णय घेत मध्यरात्री घटनास्थळ गाठले आणि बिबट्याला बाहेर काढण्याची मोहीम हाती घेतली.शहरापासून दहा ते बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या पळसे गावातील एका ऊसशेतीमधील कठडे नसलेल्या विहिरीत दोन वर्षाचा बिबट्या शुक्रवारी रात्रीच्या सुमारास पडला. मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास याबाबतची माहिती शेतक-यांनी वनविभागासह पोलिसांना कळविली. नाशिक पश्चिम वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत खैरनार, वनपरिमंडळ अधिकारी रवींद्र सोनार, वनरक्षक उत्तम पाटील, विजय पाटील, विठ्ठल कांगडी आदिंचे पथक सर्व अत्यावश्यक साधनांसह पोहचले. रात्रीचा काळोख असल्यामुळे रेस्क्यू आॅपरेशन राबविताना अडचणी निर्माण झाल्या होत्या; मात्र किमान तपमानाचा पारा ११ अंशावर असल्यामुळे आणि हवेत प्रचंड गारवा निर्माण झाल्याने पाण्यात पडलेल्या बिबट्याला बाहेर सुखरुप काढणे गरजेचे होते; अन्यथा बिबट्याच्या जीवावर बेतले असते; कारण विहिरीत असा कुठलाही आधार नव्हता की ज्याच्या सहाय्याने बिबट्या पाण्यापासून वर येऊन विहिरीत बसून रात्र काढू शकला असता. त्यामुळे खैरनार यांनी निर्णय घेतला व पथकाला सज्ज करत पोलीस, वनविभागाच्या वाहनांच्या दिवे हातातील विजे-या सुरू करणण्यात आला आणि अंधारात हरविलेली विहिर उजेडात आली. तत्काळ पोलीसांनी जमलेल्या बघ्यांच्या गर्दीला बाजूला करत बॅरिकेडींग केले. यावेळी वनविभागाच्या कर्मचा-यांनी दोरखंडाला लाकडी शिडी बांधली आणि धाडसाने विहिरीमध्ये हळुवारपणे सोडली. यावेळी पाण्यातील बिबट्या चवताळलाही व त्याने फोडलेल्या डरकाळ्या ऐकून बघ्यांची पाचावर धारण बसली. विहिरीत शिडी सोडताच अवघ्या काही मिटिांमध्ये चपळ बिबट्याने मदतीचा प्रयत्न हेरला आणि शिडीवर पाय ठेवूत तत्काळ विहीरीतून बाहेर येऊ ऊस शेतात धूम ठोकली.
पिंजरा तैनात; बिबट्याची सुटका; घबराट कायमविहिरीत पडलेल्या बिबट्याची सुटका झाली असली तरी या परिसरात नागरिकांमध्ये घबराट कायम आहे. कारण या भागात एकूण दोन बिबट्यांचा मुक्त वावर असल्याचे शेतक-यांचे म्हणणे आहे. वनविभागाने देखील शक्यता नाकारली नसून तत्काळ या भागात पिंजरा तैनात केला आहे. तसेच दिवसाही वन कर्मचा-यांनी मळ्यांचा परिसर पिंजून काढत बिबट्याच्या पाऊलखुणा शोधण्याचा प्रयत्न केला.