नाशिक : विविध क्षेत्रांत काम करणारे इंजिनिअर्स ‘विश्वकर्मा’ यांची भूमिका बजावू शकतात. त्यामुळे अभियंत्यांनी संशोधनात्मक व निमिर्तीक्षम काम करण्याची गरज असल्याचे मत निर्लेप कंपनीचे संचालक तथा महाराष्ट्र चेंबर्सचे माजी अध्यक्ष रामचंद्र भोगले यांनी व्यक्त केले. अभियंता दिनाचे औचित्य साधून दि इन्स्टिट्यूशन आॅफ इंजिनिअर्सच्या नाशिक शाखेतर्फे विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अभियंत्यांना शुक्रवारी (दि. १४) पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे उपाध्यक्ष तथा खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे आणि महाराष्ट्र चेंबर्सचे माजी अध्यक्ष राम भोगले यांच्यासह दि इन्स्टिट्यूशन आॅफ इंजिनिअर्सच्या नााशिक लोकल सेंटरचे अध्यक्ष मनीष कोठारी, सचिव सुमित खिंवसरा, विपुल मेहता, अजित पाटील, आयोजक समिती अध्यक्ष नरेंद्र बिरार, पुरस्कार निवड समिती अध्यक्ष अविनाश चिंतावार आदि उपस्थित होते. रामचंद्र भोगले म्हणाले, आधुनिक तंत्रज्ञानाची नक्कल केली तर तत्कालीन विकास दिसत असला तरी तो दीर्घकाळ टिकत नाही. मनुष्यबळ म्हणून काम करताना वयाबरोबर कामही बंद होतं. हीच अवस्था चीनसारख्या देशाची झाल्याचे त्यांनी सांगितले. तर बदलत्या काळानुसार नावीन्यपूर्ण संशोधन केल्यास त्यापासून रॉयल्टीच्या रूपाने कायमस्वरूपी पैसा मिळण्याचा मार्ग खुला होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. रोजगारासंबंधी चर्चा होताना नेहमी केवळ मर्यादित स्वरूपात होत असल्याने ही समस्या कायम आहे. बेरोजगारीची कारणे शोधून रोजगार निर्मितीसाठी कुशल मनुष्यबळ निर्मितीची गरज आहे. त्यादृष्टीने सध्याच्या सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचे मत डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी व्यक्त केले. शासकीय आणि सामाजिक नीतिमूल्ये जपताना कौटुंबिक नातीही जपण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. (प्रतिनिधी)
विकासासाठी संशोधनात्मक अभियांत्रिकीची गरज
By admin | Published: October 15, 2016 2:05 AM