मुंबईहून सुटणाऱ्या परराज्यात जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वे नाशिकरोड रेल्वे स्थानक मार्गे ये-जा करतात. रेल्वेचे आरक्षण तिकीट चार महिन्यापूर्वी आरक्षित करता येत असल्यामुळे लांब पल्ल्याच्या सर्व रेल्वे हाऊसफुल्ल आहेत. लांब पल्ल्याच्या रेल्वेना वेटिंगचेसुद्धा तिकीट मिळत नसल्याची सध्याची स्थिती आहे. लॉकडाऊन पुढे मे महिन्यात वाढू शकतो अशी भीती वाटत असल्याने, परराज्यातील प्रवासी रेल्वेचे आरक्षण तिकीट मिळविण्यासाठी धडपडत आहेत.
नाशिकरोड रेल्वे स्थानक मार्गे दररोज एकूण ६० रेल्वे ये-जा करतात. प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाकडून दररोज वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी दोन, तीन जादा रेल्वे सोडल्या जातात. नाशिकरोड रेल्वे स्थानक येथून सध्याच्या स्थितीला दररोज २० ते २५ हजार प्रवासी ये-जा करतात. लांब पल्ल्याच्या रेल्वेचे आरक्षण तिकीट मिळत नसल्याने काही प्रवासी चोर मार्गाने रेल्वे स्थानकात प्रवेश करून रेल्वेने प्रवास करीत आहेत.
आरक्षण रद्द करण्यासाठी गर्दी
गेल्या आठ दिवसापासून राज्य शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्याने तसेच शासकीय कार्यालयात उपस्थितीबाबत निर्बंध घातल्याने दररोज नाशिकहून मुंबई, ठाण्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. लाॅकडाऊनमुळे विदर्भात जाणाऱ्या प्रवाशांनी आपले आरक्षण रद्द करण्यासाठी गर्दी केली आहे. राज्याच्या राज्यात विविध भागात जाण्यासाठी रेल्वेचे आरक्षित केलेले तिकीट लाॅकडाऊनमुळे रद्द करण्यासाठी प्रवाशांनी गर्दी केली आहे. गेल्या आठ दिवसात ५०० हून अधिक आरक्षण तिकीट रद्द झाले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव त्यामुळे भविष्यात लाॅकडाऊन वाढण्याच्या शक्यतेमुळे मे महिन्यात सुटीनिमित्त बाहेरगावी फिरायला जाण्याचे नियोजन केलेल्यांपैकी अनेकांनी आपले आरक्षण रेल्वे तिकीट रद्द केले आहे.
प्रतिक्रिया====
मुंबईहून सुटणाऱ्या नाशिकरोड मार्गे परराज्यात जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या सर्वच रेल्वेला नेहमीच हाऊसफुल्ल गर्दी असते. त्या रेल्वेमध्ये नाशिकरोडहून बसणाऱ्या व उतरणाऱ्या प्रवाशांची संख्यादेखील मोठी आहे. मात्र लाॅकडाऊनमुळे व राज्य शासनाने घातलेल्या निर्बंधामुळे पंचवटी, राजधानी या दोन रेल्वेची गर्दी ओसरली आहे. तसेच विदर्भात जाणाऱ्या रेल्वेलादेखील गर्दी कमी झाली आहे. लाॅकडाऊनमुळे परराज्यात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र ज्याच्याकडे आरक्षण तिकीट आहे त्यालाच रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जात आहे.
-
आर. के. कुठार
नाशिकरोड रेल्वे स्थानक प्रबंधक