लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव व शासनाकडून होत असलेल्या आवाहनानुसार नऊ दिवसांमध्ये नाशिक शहरातील तीन आरक्षण केंद्रातून सुमारे ८ हजार रेल्वे प्रवाशांनी आपले आगामी काळातील प्रवासाचे आरक्षण तिकीट रद्द केले आहे. रेल्वे प्रशासनाकडून संबंधित प्रवाशांना सुमारे ४६ लाख रुपये परत करण्यात आले असून, यामुळे रेल्वेला मोठा आर्थिक फटका बसला आहे.
गेल्या दोन आठवड्यापासून देशाच्या विविध राज्यांत कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने शासनाकडून खबरदारीच्या विविध उपाययोजना केल्या जात आहे. त्याचाच भाग म्हणून नागरिकांनी एका ठिकाणी घोळक्याने उभे राहू नये म्हणून जमावबंदी आदेश देखील लागू करण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी खूपच गरज असेल तर प्रवास करावा अन्यथा प्रवास टाळावा असे आवाहन शासन, रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सध्या परीक्षेचा कालावधी सुरू असून सुट्टीत बहुतेक कुटबियांनी नातेवाईकांकडे अथवा बाहेरगावी फिरायला जाण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार रेल्वेचे आरक्षण तिकीट देखील निश्चित केले होते. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आगामी किमान दोन महिने प्रवास न करण्याचा निर्णय अनेकांनी घेतला. गेल्या नऊ दिवसांपासून आरक्षण टिकीट रद्द करण्याची टक्केवारी दिवसेंदिवस वाढू लागली असून, यामुळे रेल्वेचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. प्रवाशांची गर्दी होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाकडून काही गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या भीतीमुळे प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात घटू लागल्याने आर्थिकदृष्ट्या रेल्वे सुरू ठेवणे रेल्वे प्रशासनाला अवघड झाले आहे. त्यामुळे देखील रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासनाने ज्या रेल्वे रद्द केल्या आहेत त्यांचे आरक्षण तिकीट रद्द करताना रेल्वे प्रशासनाला संबंधित प्रवाशाला आरक्षण तिकिटाचे संपूर्ण पैसे परत करावे लागत आहेत.