नाशिक : राज्यात एकूण ४७ आदिवासी जमाती आहेत. त्यांच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण देण्यात यावे, अशी शिवसेनेची भूमिका असल्याचे खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितले.आदिवासी बांधवांनी घाबरून न जाता कुठल्याही अप्रचाराला बळी पडू नये, शिवसेना नेहमीच आदिवासी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, असेही खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितले. शिवसेना हा पक्ष जातीपातीचे राजकारण करत नाही. प्रत्येक समाजाला न्याय देण्याची शिवसेनेची भूमिका असते. आदिवासी बेरोजगारांसाठी व त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी विविध माध्यमांतून प्रयत्न केले आहेत. त्यामध्ये इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ तालुक्यांतील भागात अनेक विद्यार्थी उच्चशिक्षण घेत आहेत. सध्या स्पर्धा परीक्षेचे यूग असल्याने एमपीएससी व यूएपीएसीसारख्या परीक्षेची तयारी करण्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्यासाठी परीक्षा मार्गदर्शन शिबिरांचेही आयोजन करण्यात येत आहे. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व प्रशिक्षण केंद्र सरकारने उभारावे, यासाठी पाठपुरावा केल्याचे खासदार गोडसे यांनी सांगितले. परिवहनमंत्री दिवाकर रावते व सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची भेट घेऊन त्यांनाही आदिवासी विद्यार्थ्यांच्या सोयी-सुविधांबाबत निवेदन दिल्याचे खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितले आहे. (प्रतिनिधी)
धनगरांना आरक्षण द्या, मात्र आदिवासीतून नको : गोडसे
By admin | Published: December 29, 2015 10:05 PM