नाशिक : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले असून, येत्या ३ तारखेला महिला सरपंचपदाचे आरक्षण काढण्यात येणार आहे. त्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभांचे आयोजन करण्यात आले आहे.
या संदर्भातील आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी काढले आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदापैकी एकद्वितीयांश पदे ही महिला (अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागासप्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिला) यांच्यासाठी आरक्षित करण्यात आली आहेत. ग्रामपंचायतनिहाय महिला सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकानिहाय महिला आरक्षण निश्चित करण्यात येणार असून, त्यासाठीचे वेळापत्रक जिल्हा प्रशासाने जाहीर केले आहे.नाशिक तालुक्यातील महिला सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करण्यासाठी दि. ३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता नाशिक उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. मालेगाव आणि बागलाण तालुक्यातदेखील सकाळी १० वाजता सभा होणार आहे. चांदवड उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात सकाळी १० वाजता, तर दुपारी ३ वाजता देवळा तालुक्यातील ग्रामपंचायतींचे महिला सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होणार आहे.कळवण उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात सकाळी १० वाजता, तर दुपारी ३ वाजता सुरगाणा तालुक्यातील महिला सरपंचपद निश्चित होणार आहे. निफाड उपविभागीय अधिकारी कार्यालयात निफाड आणि सिन्नर तालुक्यातील ग्रामंपचायतींचे महिला सरपंचपदे निश्चित केली जाणार आहे. सकाळी १० वाजता निफाड, तर दुपारी ३ वाजता सिन्नर तालुक्यांमधील आरक्षण जाहीर केले जाणार आहे.इगतपुरी तालुक्यासाठी सकाळी १० वाजता तर त्र्यंबकेश्वरसाठी दुपारी ३ वाजता, येवला तसेच नांदगाव तालुक्यांमधील महिला सरपंचपदाचे आरक्षण अनुक्रमे सकाळी १० व दुपारी ३ वाजता निघणार आहे. दिंडोरी तालुक्यासाठी सकाळी १० वाजता तर पेठसाठी दुपारी ३ वाजता तेथील उपविभागीय अधिकारी कार्यालयांमध्ये विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.