नाशिक: राखीव जागांचे उद्दिष्ट जातिव्यवस्था नष्ट करणे हे आहे. देशातील संपत्तीचे न्याय वाटप व्हायला हवे ते आजवर होत नाही. आपला वाटा आपल्याला मिळायला हवा. आपण कुणाचे घेत नाही आहोत, आपण आपल्या हक्काचे मिळवायचे आहे. त्यामुळे राखीव जागांची लढाई ही सामूहिकरीत्या लढविण्याची आवश्यकता आहे असे मत ज्येष्ठ विचारवंत लेखक उत्तम कांबळे यांनी व्यक्त केले. ओबीसी राजकीय आरक्षणसंदर्भात होत असलेल्या घडामोडी व वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आयोजित प्रबोधन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. शाहू महाराजांनी राखीव जागांसाठी कायदा केला. समाजात ज्याला न्याय मिळाला नाही त्यासाठी ही व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. राखीव जागा या सामाजिक न्यायाच्या प्रतीक आहे. ही एक विकासाची प्रक्रिया आहे. माणूस निर्माण होण्यासाठी सामाजिक न्यायाची जोड त्याला हवी असते. त्यामुळे शाहू महाराजांनी सामाजिक न्याय मिळवून दिला असल्याचे त्यांनी सांगितले.
यापुढील काळात खासगी क्षेत्रातसुद्धा राखीव जागा मिळायला हव्यात याची तरतूद करण्याची आवश्यकता आहे. आपल्या हातात काही येतेय हे लक्षात येताच ते बंद केले जाते. वर्तमानाशी लढताना इतिहासातील योग्य-अयोग्य घटनांचा अभ्यास करायला हवा, असे कांबळे यांनी यावेळी सांगितले.
--इन्फो--
दुसऱ्या सत्रात प्रा. हरी नरके यांचे भाषण
जोपर्यंत ओबीसी, अनुसूचित जातींचे प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आपल्याला आपली भूमिका सातत्याने मांडावीच लागणार आहे. ओबीसींना शिक्षण, आरोग्य यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून होत असून, डाटा देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यासाठी ओबीसींना सतत जागे राहण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ विचारवंत लेख प्रा. हरी नरके यांनी व्यक्त केले. मंडल आयोग लागू झाल्यानंतर ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे यासाठी छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्याकडे आग्रह धरला. आणि त्यानंतर पवार यांनी ओबीसींना राजकीय आरक्षण मिळवून दिले, असेही नरके म्हणाले. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर गदा आलेली आहे. यासाठी भुजबळ लढत असल्याचेही त्यांनी सांगितले.