ओझर : येथील मुंबई - आग्रा महामार्गापलीकडे राहणाऱ्या अनेक वस्त्यांना ओझर गावात जाण्यासाठी पर्यायी रस्ताच नसल्याने त्यांनी महामार्ग प्रशासनाकडे निवेदन देत पर्यायी रस्त्याची मागणी केली आहे.
येथील मुंबई - आग्रा महामार्गावर सायखेडा फाटा चौफुलीवर तसेच शिवले कॉम्प्लेक्स ते गडाख कॉर्नर व तेथून धन्वंतरी हॉस्पिटलपर्यंत उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. दरम्यान, हे पूल एकमेकांना जोडण्याचे देखील काम जवळपास पूर्ण झाले आहे. परंतु महामार्ग पलीकडील पंचशील नगर, नवघिरे मळा, जगझाप मळा, कदम मळा, महादेव मंदिर परिसर व गाडेकरवाडी या परिसरात राहणाऱ्या नागरिकांची कोंडी झाली आहे. या सगळ्या वस्त्यांमधून ओझर गावात जाणारा रस्ता उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे बंद झाला असल्याने गावात जाण्यासाठी पर्यायी रस्ता नाही. त्यामुळे पायी जाणाऱ्या व्यक्तीला जीव मुठीत धरून महामार्ग ओलांडून जावे लागेल. त्यामुळे अपघात घडण्याची तिथे दाट शक्यता आहे. तसेच वाहनधारकांना गावात जाण्यासाठी जवळपास अर्धा किलोमीटर लांबून गडाख कॉर्नर किंवा सायखेडा फाटा चौफुलीवरून वळसा घालून जावे लागेल. या वस्त्यांमध्ये राहणारे नागरिक हे बहुतांशी कामगार असल्याने सकाळी लवकर कामावर जाण्यासाठी घाईघाईने जाऊन अपघात ओढवू न घ्यायची शक्यता आहे. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाने जनभावना व गरज लक्षात घेत महामार्गवरून जाण्यासाठी पर्यायी रस्ता करून देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा नागरिकांतर्फे देण्यात आला आहे.
------------------
विद्यार्थ्यांचाही जीव धोक्यात
मुंबई - आग्रा महामार्गाला लागूनच दोन माध्यमिक व एक प्राथमिक शाळा आहे. तिन्ही शाळांचे मिळून जवळपास तीन साडेतीन हजार विद्यार्थी आहेत. शाळेत येण्यासाठी पर्यायी रस्ता नसल्याने विद्यार्थ्यांना महामार्गाचा वापर करावा लागतो. नेहमीच बसची वाट बघत रस्त्यावर उभे रहावे लागते. भरधाव येणाऱ्या गाड्यांमुळे येथे अपघात घडण्याची दाट शक्यता आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी येणाऱ्या पालक, नागरिकांसोबतच विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात राहणार आहे. सध्या शाळा बंद असल्या तरी नंतर हा प्रश्न उद्भवणारच आहे.
--------------------
पंचशील नगर व महादेव मठात राहणारे लोक हे शेतकरी व मजुरी करणारे आहेत. यामुळे सकाळी गावात जाताना पर्यायी रस्ता नसल्याने महामार्ग ओलांडून जावे लागेल. एखादा अपघात घडला तर त्यास जबाबदार कोण राहील? आम्हांला लवकरात लवकर पर्यायी रस्ता करून द्यावा, नाहीतर तीव्र आंदोलन केले जाईल.
-प्रकाश महाले, माजी उपसरपंच ओझर.
--------------
मळ्यातून एखादा अत्यवस्थ रुग्ण गावातील हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचा असल्यास त्याला घेऊन येताना अर्धा किलोमीटर लांबून फिरून न्यावे लागेल. तसेच एखाद्या मृत व्यक्तीला गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी नेताना मोठी कसरत करीत न्यावे लागेल. या सर्व गोष्टींचा विचार करून महामार्ग प्राधिकरण विभागाने याची दखल घेत पर्यायी रस्ता करून द्यावा.
- भूषण कदम, स्थानिक रहिवासी (२७ ओझर)
===Photopath===
270321\27nsk_22_27032021_13.jpg
===Caption===
२७ ओझर