नाशिक : आडगाव येथील शैक्षणिक कारणासाठी राखीव असलेला भूखंड म्हाडाला घर बांधणीसाठी देण्यात येणार असून, हा भूखंड म्हाडाकडे वर्ग झाल्याने ग्रामस्थांनी त्यास तीव्र विरोध केला आहे. यासंदर्भात ग्रामसभेत या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.दरम्यान, ग्रामस्थांनी आमदार बाळासाहेब सानप यांना निवेदन दिले असून, १४ तारखेला या जागेवरील बांधकाम सोहळा रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.आडगाव येथील १५६०/१ हा पूर्वी ग्रामपंचायतीच्या मालकीचा होता. महापालिका स्थापन झाल्यानंतर हा गट थेट ग्रामपंचायतीकडे नसला तरी आजही ग्रामस्थांचा त्यावर दावा आहे. या तीन एकर जागेवर सध्या शैक्षणिक क्षेत्राचे आरक्षण आहे. समोरच रयत शिक्षण संस्थेची जागा असल्याने ग्रामस्थांचीदेखील ही जागा शैक्षणिक कारणासाठी उपयोगात आणावी, अशी मागणी आहे. विशेषत: ग्रामस्थांना गरज पडल्यास या जागेवर शाळेचा विस्तार किंवा महाविद्यालय होऊ शकते, असे त्यांचे म्हणणे आहे. तथापि, ही जागा आता म्हाडाला दिल्याचे कळल्यानंतर त्यांनी तलाठी कार्यालयाशी संपर्क साधला असता तेथेही पुष्टी मिळाली. त्यामुळे ग्रामस्थांचा विरोध वाढत गेला. सोमवारी (दि.१०) सकाळी मारुती मंदिरात ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली. यावेळी म्हाडाला जागा देण्यास विरोध करण्यात आला. आडगाव परिसरात म्हाडाची घरे विक्रीविना पडून आहेत, अशावेळी म्हाडाला जागा देऊन आणखी घरे बांधण्याची गरज नाही. ग्रामस्थांच्या मागणीनुसार ही जागा शैक्षणिक कारणांसाठी राखीव ठेवावी, अशी मागणी करतानाच प्रसंगी लोकप्रतिनिधींना गावबंदी करण्याच्या सूचनाही काहींनी केल्या.
भूखंड म्हाडाकडे वर्ग झाल्याने ग्रामस्थांचा विरोध
By admin | Published: April 10, 2017 10:43 PM