अडीच हजार रूपयांच्या पुढील थकबाकी असणारे गावातील सुमारे २५० नळधारकांना नोटीसा बजावण्यात येणार आहेत. आठ दिवसाच्या आत थकबाकी धारकांनी पैसे भरले नाही तर नळ कनेक्शन खंडीत केले जाणार आहे. ठाणगाव गावाला उंबरदरी धरणातून ठाणगावसह पाच गाव पाणी पुरवठा योजना २००७ पासून राबविण्यात आलेली आहे. बारामाही सुरु राहणारी ही एकमेव योजना असून या योजनेचे वीजबील सुमारे दहा लाखांच्या आसपास थकलेले आहे. आगामी काळात वीज पुरवठा खंडीत होऊ नये म्हणून ठाणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने २५० नळधारकांची अडीच हजार रूपयाच्या पुढे थकबाकी असल्याने त्यांच्यावर कडक कारवाई करावी असा बैठकीत सर्व सदस्यांच्या वतीने निर्णय घेण्यात आला. कारवाई करण्याअगोदर गावात दवंडी देऊन ग्रामस्थांना थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी आवाहन करण्यात आले. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या वतीने थकीत नळधारकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहे. याबाबत पंचायत समितीच्यावतीने ही ठाणगाव ग्रामपंचायतीस नोटीस बजावून वसुली बाबत सुचना करण्यात आली आहे.
थकबाकीधारकांचे नळ कनेक्शन खंडीत करण्याचा ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2019 5:54 PM