सिन्नर : येथील डॉ. सजंय चव्हाणके यांनी पत्नी डॉ. सुनीता चव्हाणके यांच्या स्मरणार्थ वटपौर्णिमाच्या दिवशी दशक्रिया आल्याने वटवृक्षाची लागवड करीत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. या वृक्षाचे अखंड सरंक्षण करण्याचा संकल्प डॉ. चव्हाणके व त्यांचा मुलगा समर्थराज यांनी केला.डॉ. सुनीता संजय चव्हाणके यांचे अल्पशा आजाराने निधन झाले वटपौर्णिमेच्या दिवशी त्यांचा दशक्रिया विधी आल्याने डॉ. चव्हाणके यांनी त्याच दिवशी मुसळगाव-कीर्तांगळी येथील समर्थ लॉन्स परिसरात वटवृक्षाचे रोपण केले. जीवनचक्रातून मरण अटळ आहे. पण घरातील व्यक्ती गेल्यानंतर त्या व्यक्तीच्या आठवणी कायम स्मरणात राहव्यात, यासाठी स्मारक किंवा अन्य उपक्रम राबवण्याची रीत ग्रामीण भागात आजही सुरू आहे. पण पत्नीच्या आठवणी कायम रहाव्यात यासाठी त्यांच्या दशक्रिया विधीच्या दिवशी वटवृक्ष लावून त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प कीर्तांगळी येथील चव्हाणके कुटूंबीयांनी केला.अशाच स्वरूपाचा संकल्प इतरांनीही करावा, जेणेकरून आपल्या प्रिय व्यक्ती झाडाच्या रूपात जीवंत राहतील आणि झाडांची संख्या वाढण्यास मदत होईल. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल, अशी भावना डॉ. चव्हाणके यांनी व्यक्त केली.
पत्नीच्या स्मरणार्थ वटवृक्ष संवर्धनाचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 5:44 PM