राज्य शासनाच्या वृक्षलागवड या महत्त्वाकांक्षा योजनेअंतर्गत, वनविभाग (नाशिक) व सॅमसोनाइट यांच्या मदतीने क. का. वाघ अभियांत्रिकी शिक्षण व संशोधन संस्थेच्या एन.एस.एस. विभाग व संशोधन विभाग आणि स्वप्नपूर्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रोहिले गावात दोन हजार दोनशे पन्नास वृक्षांचे रोपण करण्यात येऊन संगोपनाचा संकल्प करण्यात आला.पर्यावरण रक्षणासाठीचा ध्यास व वृक्षलागवडीची आस बाळगून २०० स्वयंसेवकांनी उपक्रमात सहभाग नोंदवला. वन विभागाने ठरवून दिलेली पाच प्रजातींच्या हजारो वृक्षांचे हिरवे स्वप्न यावेळी जमिनीत रुजवण्यात आले. निसर्गाचे संवर्धनकेल्याचा आनंद यावेळी प्रत्येक स्वयंसेवकाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. उपस्थितांनी यावेळी पर्यावरण रक्षण आणि निसर्ग संवधर्रनाची शपथ घेतली. उपक्रमासाठी वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. के. एन. नांदूरकर, राष्टÑीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.एन.बी. गुरुळे, स्वयंसेवक मिलिंद वैद्य, ‘स्वप्नपूर्ती फाउंडेशन’चे संस्थापक सचिन काकडे यांचे मार्गदर्शन लाभले.