नाशिक : शहरातून वाहणाºया नासर्डी नदीचा पूरप्रभाव कमी करण्यासाठी नदीपात्रातील बंधारे हटविण्याचा प्रशासनानेच सादर केलेला पश्चिम प्रभाग समितीतील एकमेव प्रस्तावही प्रशासनाने मागे घेतल्याने त्याचे तीव्र पडसाद समितीच्या बैठकीत उमटले आणि सभापती डॉ. हेमलता पाटील यांच्यासह सदस्यांनी प्रशासनाचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. नागरी हिताचे प्रस्ताव आणण्यासाठी नगरसेवकांना मोठा आटापिटा करावा लागतो. त्यानंतरही अशा प्रकारच्या कामाची प्रशासनाला गरज नसल्याचा साक्षात्कार होत असेल तर आयुक्तांच्या लेखी नगरसेवक चोर आहेत का, असा संतप्त प्रश्न यावेळी सभापती डॉ. पाटील यांनी केला. यासंदर्भात पश्चिम प्रभाग समितीतील सर्व नगरसेवकांच्या भावना व्यक्त करणारे पत्रच आयुक्तांना सादर केले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. महापालिकेच्या पश्चिम प्रभाग समितीची मासिक सभा सभापती डॉ. हेमलता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी बोलावण्यात आली होती. समितीच्या विषयपत्रिकेवर अगोदरच्या सभेचे इतिवृत्त वगळता सभापटलावरील नासर्डी नदीचा पूरप्रभाव कमी करण्यासाठी नदीपात्रातील बंधारे हटविण्याचा यापूर्वीच्या आयुक्तांचाच एकमेव प्रस्ताव होता. परंतु तोही प्रशासनाने मागे घेतल्याने डॉ. पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. वर्षभर पाठपुरावा करून नगरसेवक विकासकामांचे प्रस्ताव प्रभाग सभा, महासभेवर आणण्यासाठी धावपळ करतात. मात्र, ऐनवेळी या कामांची निकडच नाही, असा साक्षात्कार प्रशासनाला अचानक कसा झाला, असा प्रश्न उपस्थित करीत आयुक्तांची ही कृती अन्यायकारक असल्याचा आरोप डॉ. पाटील यांनी केला. आयुक्तांना खर्चच कमी करायचा असेल, तर त्यांनी मनपाची अन्य कार्यालये तसेच वाहनांवर होणारा खर्च कमी करावा, असा सल्ला समीर कांबळे यांनी दिला. यावेळी झालेल्या चर्चेत वत्सला खैरे, प्रियंका घाटे, हिमगौरी आडके-अहेर यांनी सहभाग घेतला.
एकमेव प्रस्ताव मागे घेतल्याने आयुक्तांचा निषेध पश्चिम प्रभाग सभा : आयुक्तांना लेखी पत्र देण्याचा ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2018 1:52 AM
नाशिक : शहरातून वाहणाºया नासर्डी नदीचा पूरप्रभाव कमी करण्यासाठी नदीपात्रातील बंधारे हटविण्याचा प्रशासनानेच सादर केलेला पश्चिम प्रभाग समितीतील एकमेव प्रस्तावही प्रशासनाने मागे घेतल्याने त्याचे तीव्र पडसाद समितीच्या बैठकीत उमटले.
ठळक मुद्देसदस्यांनी प्रशासनाचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केलासाक्षात्कार प्रशासनाला अचानक कसा झाला, असा प्रश्न