नाशिक- दर बारा वर्षांनी भरणाऱ्या कुंभमेळा यंदा 2026- 27 मध्ये भरणार आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे भरणाऱ्या या कुंभ मेळ्यासाठी शासनाच्या वतीने चार समिती घोषित करण्यात आल्या आहेत या जिल्हास्तरीय समितीमध्ये पालकमंत्री दादा भुसे यांना अध्यक्षपद देण्याऐवजी राज्याचे ग्रामविकास आणि पर्यटन मंत्री म्हणजेच गिरीश महाजन यांना अध्यक्ष करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समिती असून त्यात अठरा सदस्यांचा समावेश असेल. यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपाध्यक्ष तर दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सदस्य असतील. यानंतर उच्च अधिकार समितीही राज्यस्तरावर असणार आहे तर जिल्हास्तरावर जिल्हास्तरीय समिती आणि त्या खालोखाल जिल्हास्तरीय कार्यकारी समिती असणार आहे कार्यकारी समिती केवळ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मात्र, जिल्हास्तरीय समिती गठित करताना पालकमंत्री दादा भुसे यांच्या ऐवजी ग्रामविकास आणि पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांना स्थान देण्यात आले आहे. पालकमंत्री दादा भुसे यांना सहअध्यक्ष करण्यात आले आहे. नाशिकचे माजी पालकमंत्री आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ तसेच विद्यमान पालकमंत्री दादा भुसे यांच्यात फारसे सख्य नसून त्यामुळेच मधला मार्ग म्हणून गिरीश महाजन यांना समितीचे अध्यक्षपद देण्यात आल्याची ही चर्चा आहे.