आडगाव : आडगाव-म्हसरूळ रस्त्यावर काही वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेला म्हाडा प्रकल्प पूर्ण होऊनही मागणीअभावी अजून रिक्तच आहे. खासगी बांधकाम व्यावसायिकांच्या सदनिकांचे दर व म्हाडाच्या सदनिकांचे दर यात फरक असून, खासगी व्यावसायिकांपेक्षा दर अधिक असल्यामुळे प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगितले जात आहेत. आडगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलजवळील सर्व्हे नं. १५६०/१ ही जागा शाळेला मिळावी, अशी ग्रामस्थांची भूमिका होती. त्यासाठी ग्रामस्थांनी जनआंदोलनदेखील केले होते, पण कोणत्याही विरोधाला न जुमानता मागीलवर्षी कामाला सुरुवात झाली. मात्र दुसरीकडे काही वर्षांपूर्वी आडगाव-म्हसरूळ रस्त्यावर बांधण्यात आलेली घरे अजूनही रिक्तच आहेत. येथील सर्व्हे नं ६०९ मध्ये ४१६ सदनिकांची वसाहत असून, या घरांना अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. म्हाडा ही शासकीय संस्था असून, त्यांच्या घरांच्या तुलनेत खासगी बांधकाम व्यावसायिकांच्या सदनिकांचे दर कमी आहेत. त्यामुळे महाग असलेल्या म्हाडाच्या घरांना प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, एका वसाहतीचे काम पूर्ण होऊनही प्रतिसाद मिळत नसताना दुसरा प्रकल्प पूर्ण करण्याचा अट्टाहास म्हाडा कशासाठी करीत आहे, असा प्रश्न यानिमित्ताने आडगावचे ग्रामस्थ करीत आहे. आडगाव येथील शाळेसाठी आवश्यक असलेल्या भूखंडावर घरे बांधण्यासाठी ग्रामस्थांनी विरोध केला होता. तसेच आंदोलनेदेखील केली होती.गेल्यावर्षी म्हाडाच्या नियोजित प्रकल्पाच्या ठिकाणी ग्रामस्थांनी आंदोलन उभे करून विरोध केला होता. कारण म्हाडाचा आधीच पूर्ण झालेला प्रकल्प रिक्त असताना दुसरा प्रकल्प कशासाठी, अशी ग्रामस्थांची भूमिका होती. पण ग्रामस्थांचा विरोध असताना नवीन प्रकल्प पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. - अभय माळोदे, स्थानिक रहिवासी
म्हाडाच्या घरांना मिळेना प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 12:17 AM