देवळाली कॅम्प : आजच्या विद्यार्थ्यांनी कौशल्य विकासावर भर देत या प्रदर्शनात शाळेत शिकविल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या वैज्ञानिक संकल्पना स्पष्ट करण्याची भूमिका पार पाडावी जेणे करून भविष्यातील वैज्ञानिक निर्माण होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन खासदार हेमंत गोडसे यांनी केले.देवळाली कॅम्पच्या कॅन्टोन्मेंट बोर्ड संयुक्त प्राथमिक शाळा व हायस्कूलमध्ये ४५व्या तालुका विज्ञान प्रदर्शनाचे उद््घाटन खासदार गोडसे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. शिक्षण विभाग, पंचायत समिती आणि नाशिक तालुका विज्ञान अध्यापक संघ यांच्या वतीने प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंचायत समितीचे सभापती रत्नाकर चुंभळे, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष भगवान कटारिया व मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार, महिला व बालकल्याण सभापती अर्पणा खोसकर, डॉ.मंगेश सोनवणे, उज्ज्वला जाधव, कावेरी कासार, प्रभावती धिवरे, आशा गोडसे, उमेश गोरवाडकर, भाऊसाहेब धिवरे, चंद्रकांत गोडसे, गटशिक्षण अधिकारी सुनीता धनगर, विस्तार अधिकारी प्रकाश वैष्णव, डी. एस. अहिरे, एल. एम. चव्हाण आदी उपस्थित होते. नाशिक तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विभागातील सुमारे ८९ शाळांनी सहभाग नोंदवत शेतीपूरक, रस्ता सुरक्षा, सौर ऊर्जा वापर, पवनऊर्जा, कृषी अवजारे, पाणी व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, गणितीय व भौमितीय सिद्धांतांचा आधार घेत सुमारे शंभराहून अधिक विविध प्रयोगांचे सादरीकरण या प्रदर्शनद्वारे केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक नलिनी लोखंडे यांनी सूत्रसंचालन स्मिता पाटील, सुनीता बेडसे, तर आभार निंबाजी खैरनार यांनी मानले. याप्रसंगी भाऊसाहेब ठाकरे, भाऊसाहेब जगताप, पुरुषोत्तम रकिबे, माधुरी कुलकर्णी, जयमाला पाटोळे, संग्राम करंजकर आदींसह तालुक्यातील विविध शाळांचे विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते.
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 12:31 AM