त्र्यंबकेश्वर : महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आंबा फळबाग लागवडीस शेतक-यांचा प्रतिसाद लाभत असून सदर योजना आमच्याही गावात राबवा अशी मागणी होत आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत फळबाग लागवडीची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजने अंतर्गत हरसुल व त्र्यंबक तालुक्याच्या इतर भागातून आंबा फळबाग लागवडीचे काम प्रगतीपथावर आहे. पावसाचे आगमन वेळेवर झाल्याने आंबा रोपांना खड्डे खोदण्यासाठी शेतक-यांची लगबग दिसून येत आहे. तसेच रोपे लागवडीचे काम प्रगतीपथावर आहे.
चालूवर्षी तालुक्यातुन २१४ शेतक-यांची १८८ हेक्टर क्षेत्रावर (बांधावर) लागवड, ९५० शेतक-यांची १५२ हेक्टर क्षेत्रावर घन लागवड, अशी ११६४ शेतक-यांची ३४० हेक्टर क्षेत्रावर फळबाग योजनेची कामे प्रस्तावित आहेत. या मोहीमेस तालुका कृषी अधिकारी संदीप वळवी, आनंद कांबळे, अनिल गावित, मंडल कृषि अधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले.