विरगाव : येथील ग्रामपंचायत कार्यालयात बुधवारी (दि.३) कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी सटाणा दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश एस. डी. चव्हाण उपस्थित होते.वर्षानुवर्षे न्यायालयीन पातळीवर चालू असलेली कौटुंबिक तसेच सामाजिक स्तरावरील विविध प्रकरणे समझोत्यातून मिटविणे ही काळाची खरीखुरी गरज असल्याचे प्रतिपादन न्यायाधीश चव्हाण यांनी केले. गावपातळीवर उद्भवणारे अनेक वादविवाद व सामाजिक तंटे हे गावपातळीवरच मिटविणे शक्य असून यासाठी गावागावात सामाजिक एकोपा ठेवण्याची गरज आहे. याच प्रकारे वर्षानुवर्षे अनेक प्रलंबित न्यायालयीन खटल्यांचाही समझोत्यातून निपटारा केला जाऊ शकतो असे त्यांनी यावेळी सांगितले. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामस्थांनी वेळोवेळी ग्राम पंचायतीला कर भरण्याची गरज आहे. मात्र अनेक ग्रामस्थ याकडे सर्रास दुर्लक्ष करतांना दिसून येतात. अश्या थकबाकीदारांना ग्रामपंचायतीने न्यायालयामार्फत नोटीस पाठवून वसुलीची कारवाई करावी असे आवाहनही न्यायाधीश चव्हाण यांनी यावेळी केले. त्यानंतर येथील केबीएच विद्यालय परिसरात मान्यवरांच्या हस्ते पुस्तकवाटप व वृक्षारोपण करण्यात आले.याप्रसंगी सह. दिवाणी न्यायाधीश व्ही. ए. आव्हाड, वकील पी. पी. भामरे, ए.एल. पाटील, वाय. एच. पाटील, वाय. बी. मोरे, एस. आर. कुलकर्णी, पंचायत समिती विस्तार अधिकारी नितीन देशमुख, सरपंच ज्ञानेश्वर देवरे, उपसरपंच अशोक सोनवणे, एस. टी. देवरे, अशोक देवरे, शांताराम भामरे, जीभाऊ निकम, प्रभाकर देवरे, चिंतामण आहिरे, हेमंत गांगुर्डे, विनायक बच्छाव, हेमंत देवरे, पोलीस पाटील अशोक पवार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.