लसीकरण सुरुवातीच्या काळात नागरिकांनी लसीकरण करण्याकडे दुर्लक्ष केले होते. प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ग्रामीण भागात राबविण्यात येणाऱ्या लसीकरणाकडे नागरिकांनी पाठ फिरवली होती, परंतु सध्या मर्यादित डोस असताना नागरिक लसीकरण केंद्रांवर पोहोचत आहेत. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये ठिकठिकाणी लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी ज्या गावांत लसीकरण असते, तेथील तसेच दुसऱ्या गावातील नागरिक हजेरी लावत असल्याने गर्दी होत आहे.
मालेगाव तालुक्यातील वडनेर खाकुर्डी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने सावतावाडी गावात शनिवारी लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यासाठी १३० डोस उपलब्ध झाले होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती मिळाल्यानंतर नागरिक सकाळपासून केंद्रांवर पोहाेचले होते. यामध्ये आजूबाजूच्या गावांतील नागरिकांचाही समावेश होता. वैद्यकीय अधिकारी डॉ. सपना बाविस्कर, परिचारिका परिणीता अहीरराव, आरोग्यसेवक कापडणीस, भूषण बुनगे, जगदीश कापडणीस आदींनी मोहीम यशस्वी केली. यावेळी सरपंच, उपसरपंच, सदस्य उपस्थित होते.